अवैध दारू वाहतुकीवर धाड, सव्वा पाच लाखाचा येवज जप्त !
उदगीर (एल.पी.उगीले) उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत अवैध दारू विक्री मोठ्या प्रमाणात सुरू असल्याची ओरड चालू आहे. या गोष्टीचे गांभीर्य विचारात घेऊन पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस अंमलदार राम बनसोडे, व्यंकट शिरसे, राहुल नागरगोजे, तुळशीराम बुरुरे, राहुल गायकवाड, सचिन नाडागुडे यांच्या विशेष पथकाने विभागीय पोलीस उपाधीक्षक डॅनियल जॉन बेन यांच्या मार्गदर्शनाखाली करखेली ते चिगळी जाणाऱ्या रोडवर एका शेताजवळ धाड टाकून एका सिल्वर रंगाच्या क्रुझर (चार चाकी) गाडी मधून अवैध देशी दारूची वाहतूक होत असताना रंगेहात पकडले. त्या चार चाकी वाहनातील वीस खाकी रंगाचे खपटी बॉक्स, प्रति बॉक्समध्ये देशी दारू भिंगरी संत्रा असे लेबल असलेल्या 180 एम एल च्या 48 सीलबंद बाटल्या असे एकूण 960 सीलबंद बाटल्या, प्रति बॉटल किंमत 80 रुपये प्रमाणे अंदाजे किंमत 76 हजार 800 रुपये किमतीचा प्रोव्हिजनल माल आणि सिल्वर रंगाची क्रूजर चार चाकी गाडी क्रमांक के ए 32 – 9400 जुनी वापरात असलेली ज्याची अंदाजे किंमत चार लाख पन्नास हजार असा एकूण पाच लाख सव्वीस हजार आठशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
याप्रकरणी पोलीस हेडकॉन्स्टेबल राहुल बाबुराव नागरगोजे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशन येथे प्रो.गु.र.न. 100/23 कलम 65 (अ)(ई), 81 महाराष्ट्र दारूबंदी कायदा अंतर्गत आरोपी चांद निजाम सय्यद रा. तळेगाव ता. देवनी याच्या विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. दिनांक 18 फेब्रुवारी रोजी मध्यरात्रीच्या सुमारास करखेली ते चिखली जाणाऱ्या रोडने एकनाथ बिरादार यांच्या शेता जवळ साधारणता उदगीर पासून 15 किलोमीटर अंतरावर एक सिल्वर रंगाची क्रुझर अवैध दारू घेऊन जात असल्याची खबर समजताच, ग्रामीण पोलिसांच्या या विशेष पथकाने धाड टाकली,त्या ठिकाणी एक व्यक्ती अवैध देशी दारू स्वतःच्या कब्जात बाळगून, चोरटी विक्री करण्यासाठी घेऊन जाताना रंगेहात पकडले आहे. याप्रकरणी संशयित आरोपी म्हणून या वाहनाचे चालक यांच्या सांगण्यावरून हनुमंत कोनाळे रा. तळेगाव यांच्याही विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
उपविभागीय पोलीस अधिकारी डॅनियल जॉन बेन यांच्या मार्गदर्शनाखाली उदगीर ग्रामीणचे पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे प्रगटीकरण विभागाचे पोलिसामलदार तुळशीराम बोरुरे, राहुल गायकवाड, राम बनसोडे, व्यंकट शिरसे, राहुल नागरगोजे, सचिन नाडागुडे हे अधिक तपास करत आहेत.