जिल्ह्यातील अवैध आणि बनावट विषारी दारू बंद करा – निवृत्तराव सांगवे
उदगीर (एल.पी.उगीले) : लातूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात परप्रांतातून आलेली देशी आणि विदेशी दारू, त्यात रसायन मिश्रन करून जुन्या बॉटलमध्ये त्या दारू भरून सील करून विक्रीचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालू आहे. एखाद्या कंपनी प्रमाणे ही बनावट दारू बनवणारी कंपनी गेल्यावर्षी राज्य उत्पादन शुल्क विभागाने धाड टाकून उध्वस्त करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र पुन्हा, “येरे माझ्या मागल्या, कालच्याच ताक कन्या चांगल्या…”या उक्तीप्रमाणे पुन्हा पुन्हा बनावट आणि रसायन मिश्रित दारू विक्री चालूच आहे. अनेक धाब्यावरून लातूर जिल्ह्यात अशा पद्धतीची बनावट दारू राजरोसपणे विक्री होत आहे, या बाबीचा विचार करून प्रशासनाने गंभीर कारवाई करावी अशी ही मागणी केली आहे. या बनावट दारूमुळे अनेकांचे जीवन उद्ध्वस्त होत चालले आहेत.
विशेष म्हणजे राज्य उत्पादन शुल्क विभागातील कर्मचारी, अधिकारी ही या बाबीकडे गांभीर्याने पाहत नाहीत, तसेच पोलीस प्रशासनातील काही कर्मचारीही अशा अवैध व्यावसायिकांना पाठीशी घालून प्रोत्साहन देत आहेत. ही अत्यंत लाजिरवाणी बाब आहे. या गोष्टीचे गांभीर्य विचारात घेऊन राज्य उत्पादन शुल्क विभागाने आणि जिल्हा महसूल प्रशासनाने हा प्रकार बंद होण्यासाठी विशेष मोहीम राबवणे गरजेचे आहे. यासाठी राष्ट्रीय दलित अधिकार मंचचे प्रदेशाध्यक्ष निवृत्तीराव सांगळे यांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे मंत्री ना. शंभूराज देसाई, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे प्रधान सचिव मिलिंद म्हैसेकर, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांना पाठवलेल्या निवेदनात कारवाईची मागणी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा पोलीस अधीक्षक, लातूर जिल्हाधिकारी यांनाही देण्यात आल्या आहेत.