महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण विषयी कार्यशाळेची सांगता
उदगीर (एल.पी.उगीले) : येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण कार्यशाळेची सांगता झाली. कार्यशाळेसाठी साधन व्यक्ती म्हणून प्रा.डॉ.भूषणकुमार जोरगुलवार आणि प्रा.डॉ.डी.एन.मोरे यांची उपस्थिती होती. अध्यक्षस्थानी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष अॅड.प्रकाश तोंडारे होते, मंचावर सचिव रामचंद्र तिरुके, सहसचिव अॅड.एस.टी. पाटील, कोषाध्यक्ष भालचंद्र चाकूरकर, प्रा.मनोहर पटवारी, सुभाष धनुरे, प्रशांत पेन्सलवार,व डॉ्.विजयकुमार पाटील, प्रभारी प्राचार्य डॉ.बी.एम.संदीकर, उपप्राचार्य डॉ.आर.के.मस्के यांची उपस्थिती होती. यावेळी बोलताना डॉ.जोरगुलवार म्हणाले, बहुमुखी शैक्षणिक वाटचाल राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात अंतर्गत असून सहज प्रवेश, समानता, गुणवत्तापूर्ण शिक्षण, परवडणारे शिक्षण, उत्तरदायी शिक्षण अशा बाबी नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात आहेत. डॉ.डी.एन.मोरे म्हणाले, महाविद्यालयीन शिक्षणात बहुविद्याशाखीय व आंतरविद्याशाखीय दृष्टिकोन, कौशल्य विकास व्यावसायिक शिक्षण याचा समावेश झाला असून विद्यार्थ्यांना आवडीने विषय निवडण्याची संधी विद्यार्थ्यांना शिक्षणात प्रवेश आणि निर्गमन घेण्याची संधी असून सिद्धांतिक आणि प्रात्यक्षिक शिक्षण दिले जाणार आहे. अध्यक्षीय समारोपात अॅड.तोंडारे म्हणाले, दोन्ही वक्त्यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या संदर्भात बहुमूल्य मार्गदर्शन करून दिशादर्शन केल्याचे सांगितले. या कार्यशाळेसाठी अनेक महाविद्यालयातील प्राध्यापक तसेच विद्यार्थी उपस्थित होते. कार्यशाळेचे प्रास्ताविक प्रभारी प्राचार्य डॉ.बी.एम.संदीकर यांनी केले. सूत्रसंचालन प्रा.डॉ.बी.डी.करंडे यांनी केले तर आभार ग्रंथपाल डॉ.एल.बी.पेन्सलवार यांनी मानले.
