पोटनिवडणुकीच्या बंदोबस्तात पोलिसांना हलगर्जीपणा करणे पडलं महागात!

पोटनिवडणुकीच्या बंदोबस्तात पोलिसांना हलगर्जीपणा करणे पडलं महागात!

पोलिस उपायुक्त स्मार्तना पाटील यांनी  30 पोलिसांना घेतले फैलावर

पुणे (केशव नवले) : कसबा पोटनिवडणुकीतील प्रचार अंतिम टप्यात आलेला असताना बंदोबस्तात कसुर करणाऱ्या पुणे पोलीस दलातील 30 पोलीस कर्मचाऱ्यांना शिक्षा सुनावण्यात आली आहे. परिमंडळ दोनच्या पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत.

पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेल्या बंदोबस्तासाठी उशीरा पोहोचणाऱ्या पोलिसांना ‘सक्त ताकीद’ देण्यात आली आहे. वेगवेगळ्या पोलीस ठाण्यातील 30 कर्मचाऱ्यांना एकाच वेळी शिक्षा देण्यात आल्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे.कसबा पोटनिवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार, विरोधी पक्षनेते अजित पवार, शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे प्रचारात उतरल्याने राजकीय वातावरण तापले आहे. प्रचारादरम्यान कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन नये, यासाठी पुणे पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्वारगेट चौकात पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. बंदोबस्तासाठी वेळेत पोहोचण्याच्या सूचना संबंधीत पोलिसांना देण्यात आल्या होत्या.

सकाळी नऊ वाजता बंदोबस्त सुरू झाला होता. मात्र स्वारगेट, भारती विद्यापीठ, लष्कर, सहकारनगर पोलीस ठाण्यातील 30 पोलीस कर्मचारी बंदोबस्ताच्या ठिकाणी एक तास उशिरा पोहोचले.उशीरा बंदोबस्तास हजर राहिलेल्या पोलिसांना पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील यांनी ‘सक्त ताकीद’ दिली आहे. बंदोबस्तात कसुर करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांचे वर्तन पोलीस खात्याच्या शिस्तीला धरुन नसल्याचे पोलीस उपायुक्त पाटील यांनी आदेशात म्हटले आहे.

About The Author

error: Content is protected !!