श्यामलाल स्मारक शिक्षण संस्थेचा ऐतिहासिक विजय
उदगीर (एल.पी.उगीले) : येथील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अविरतपणे कार्य करणाऱ्या श्यामलाल स्मारक शिक्षण संस्थेचा ऐतिहासिक विजय झाला. धर्मादाय आयुक्ताने न्यायप्रविष्ठ असलेल्या विद्यमान कार्यकारिनीस मान्यता देऊन विद्यार्थी, पालक व शिक्षणप्रेमी उदगीरवासी यांचा आनंद द्विगुणित केला आहे. सद्भावनेने राष्ट्रीय शैक्षणिक कार्यास बळ व मान्यता देण्याचे महान कार्य धर्मदाय आयुक्त यांच्याकडून बहाल करण्यात आले आहे.
या अभूतपूर्व यशाबद्दल श्यामलाल स्मारक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ऍड. सुपोषपाणी आर्य, उपाध्यक्ष गिरीष मुंडकर, सचिव ऍड.विक्रम संकाये , सहसचिव अंजुमनीताई आर्य यांच्या ऐतिहासिक विजयाबद्दल सत्कार सोहळा कार्यक्रमाचे आयोजन उदगीर येथील ऐतिहासिक वारसा असलेल्या किल्ल्यामधील उदयगिरी महाराज मठ संस्थान येथे क्षेत्रभेट आयोजित करून करण्यात आली होती.
श्यामलाल माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक आनंद चोबळे, श्यामार्य कन्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका तृप्ती ज्ञाते, श्यामलाल प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक विवेक उगीले ,शिवाजी विद्यालय रोहिणाचे मुख्याध्यापक शिंदे गौतम, श्यामलाल सार्वजनिक वाचनालयाचे ग्रंथपाल सूर्यकांत शिरसे यांच्या संयुक्त विद्यमानाने श्यामलाल स्मारक शिक्षण संस्थेतील सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत सर्व पदाधिकाऱ्यांचे या यशाबद्दल स्वागत सत्कार करण्यात आले.
याप्रसंगी भारतीय शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्यवाह लासुने अण्णा तसेच योगगुरू धनराज बिरादार, मोहनराव निडवंचे, अभंगराव कोयले, महादेव खताळ, सुनील बागडे, ज्ञानेश्वर सपाटे, वसंत गोखले,संतोष सगर यांच्यातर्फे सर्व पदाधिकाऱ्यांचे स्वागत सत्कार करण्यात आला . या कार्यक्रमा प्रसंगी मोहनराव निडवंचे, अभंगराव कोयले, धनराज बिरादार, महादेव खताळ, उमाकांत सूर्यवंशी यांनी या ऐतिहासिक विजयाबद्दल आपल्या मनोगतातून अभिनंदन व कौतुक केले. व पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाप्रसंगी तेजस अंबेसंगे, संकाये मॅडम व्यासपीठावर उपस्थित होत्या.
श्यामलाल स्मारक शिक्षण संस्थेचे सचिव ऍड. विक्रम संकाये यांनी ही कार्यकारिणी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी आत्मविश्वासाने कार्य करणारी आहे , सनदशीर मार्गाने न्यायालयीन लढाई आम्ही जिंकलेली आहे असे मत व्यक्त केले.अध्यक्षीय समारोपामध्ये ऍड. सुपोषपाणि आर्य यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी ही संस्था अविरतपणे कार्य करत आहे, विद्यार्थी केंद्रबिंदू मानून विद्यार्थी उपयोगी उपक्रमांचे आयोजन ही संस्था वेळोवेळी करते, या सर्व कार्याचा उजाळा याप्रसंगी केला. भाई श्यामलालजी, भाई बन्सीलालजी यांच्या मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या कार्यातील बलिदानामुळे व सत्कर्मामुळे हा ऐतिहासिक विजय आम्हाला मिळाला, यापुढे अधिक गतीने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी ही कार्यकारिणी उत्साहाने कार्य करेल. असेही मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीहरी निडवंचे यांनी केले. प्रार्थना गीत विजय बैले यांनी सादर केले व आभार व्यक्त करण्याचे कार्य श्यामलाल मेमोरियल हायस्कूलचे मुख्याध्यापक आनंद चोबळे यांनी केले.
