मराठी भाषेचा गौरव अविरतपणे होत राहणार – गोविंद भुरे

मराठी भाषेचा गौरव अविरतपणे होत राहणार - गोविंद भुरे

उदगीर (एल.पी.उगीले) : मराठी साहित्यामध्ये अनेक साहित्यिकांनी मराठीचा बोलबाला खूप केलेला आहे. मराठीचा गौरव केलेला आहे, त्याच पद्धतीचा गौरव कवी कुसुमाग्रज यांनी केलेला आहे. म्हणून त्यांचा जन्मदिन राजभाषा दिन म्हणून साजरा केला जातो. अशा साहित्यिकांच्या कार्यामुळे व आपणा सर्वामुळे मराठी भाषेचा गौरव अविरतपणे होत राहणार, असे मत विद्यावर्धिनी विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक गोविंद भुरे यांनी काढले.

शिवाजी महाविद्यालयात मराठी विभागाने आयोजित केलेल्या मराठी राजभाषा दिनानिमित्त बोलत होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष उपप्राचार्य डॉ आर एम मांजरे हे होते, तर कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती मराठी विभाग प्रमुख डॉ. सुरेश शिंदे, डॉ कदम नरसिंग यांची होती. पुढे बोलताना भुरे म्हणाले, कवी कुसुमाग्रज यांचे नाव विष्णू वामन शिरवाडकर आहे. त्यांना साहित्याबद्दल ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे. मराठी साहित्याला त्यांनी खूप मोठे योगदान दिलेले आहे. हे सांगत असताना त्यांनी पोवाडे,पाळणा, कविता अशा विविध माध्यमातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. अध्यक्षीय समारोप प्रसंगी उपप्राचार्य डॉ. मांजरे म्हणाले बालकवी, भा रा तांबे ,वि स खांडेकर आदी साहित्यिकांनी मराठीला एक दर्जा प्राप्त करून दिलेला आहे. मराठी भाषेला चांगले दिवस आणण्यासाठी आम्ही सर्वांनी योगदान दिले पाहिजे, असेही ते म्हणाले. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते कवी कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठी विभाग प्रमुख डॉ.सुरेश शिंदे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा एन एस केंद्रे यांनी तर आभार निखिल कसबे या विद्यार्थ्याने मानले. यावेळी महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने कार्यक्रमाला उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!