लाल बहादूर शास्त्री प्राथमिक शाळेत मराठी भाषा गौरव दिनानिमित्त कार्यक्रम संपन्न
उदगीर (एल.पी.उगीले) : भारतीय शिक्षण प्रसारक संस्था,अंबाजोगाई संचलित लाल बहादूर शास्त्री प्राथमिक विद्यालयात विद्यार्थ्यांना मराठी भाषेचा गौरव म्हणून,मराठी भाषेचे महत्त्व समजावून देण्यासाठी महाराष्ट्राचे ज्येष्ठ कवी,ज्ञानपीठ पुरस्कार विजेते विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्यात आला.या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून मुख्याध्यापक अंकुश मिरगुडे तर, प्रमुख वक्ते म्हणून माधव केंद्रे व प्रमुख पाहुणे म्हणून विभाग प्रमुख सुधाकर पोलावार उपस्थित होते.मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते प्रतिमा पूजन व दिपप्रज्वलन करण्यात आले.मान्यवर पाहुण्यांचे शाळेच्या वतीने स्वागत करण्यात आले.
याप्रसंगी विद्यार्थ्यांनी वि.वा.शिरवाडकर यांच्याबद्दल,मराठी भाषेचे महत्त्व आपल्या भाषणातून सांगितले. तसेच,मराठी कविता सादर केल्या.कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते माधव केंद्रे यांनी विष्णू वामन शिरवाडकर यांना कुसुमाग्रज का म्हणतात?त्यांचे शिक्षण, सामाजिक कार्य व साहित्य लेखनाविषयी मार्गदर्शन केले.ते मराठी भाषेतील अग्रगण्य कवी,लेखक,नाटककार, कथाकार व समीक्षक होते.त्यांचा विशाखा काव्यसंग्रह प्रसिद्ध आहे.त्यांना विविध साहित्य लेखनासाठी मिळालेल्या विविध पुरस्काराबद्दल माहिती सांगितली.
अध्यक्षीय समारोपपर भाषणात मुख्याध्यापक अंकुश मिरगुडे यांनी कुसुमाग्रजांच्या साहित्याबद्दल सांगताना आपला सामाजिक,बौद्धिक व सर्वच क्षेत्रातील विकास हा आपल्या मातृभाषेतूनच होतो.आपल्या दैनंदिन जीवनात मराठी भाषेचा जास्तीत जास्त वापर करावा,असे आवाहन केले. व कुसुमाग्रजांच्या स्मृतींना अभिवादन केले.सुत्रसंचलन श्रीमती निताताई वट्टमवार यांनी केले.वैयक्तिक पद्य रमेश सातपुते यांनी गाईले.आभार सौ.भाग्यश्री स्वामीबाईंनी मानले.
