मंडळ अधिकाऱ्याच्या त्रासाला कंटाळून वयोवृद्ध शेतकऱ्याचा आत्मदहनाचा इशारा
अहमदपूर (गोविंद काळे) : तालुक्यातील किनी कदु येथील एका वयोवृद्ध शेतकऱ्याचे वाटणीपत्राच्या आधारे फेरफार करण्यासाठी संबंधीत मंडळ अधिकारी कार्यालयात वारंवार खेटे मारून सुद्धा काम होत नसल्यामुळे व पैश्याची मागणी करीत असल्यामुळे त्याच्या त्रासाला कंटाळून शेतकऱ्याने आत्मदहन करण्याचा इशारा जिल्हाधिकारी लातुर यांच्याकडे निवेदनाद्वारे दिला आहे
याविषयी सविस्तर माहीती अशी की,तालुक्यातील किनी कदु येथील एका शेतकऱ्याने मंडळ अधिकाऱ्याच्या त्रासाला कंटाळून जिल्हाधिकारी लातुर यांना आत्मदहन करण्याचा इशारा दिला असून शेतकऱ्याने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,मी अर्जदार उद्धवराव विठ्ठलराव उंदीरकल्ले वय 80 वर्ष रा. किनी कद्दू ता. अहमदपूर जि.लातूर येथील रहिवासी असून मी वयोवृद्ध आजारी नागरिक आहे. महाराष्ट्र महसूल अधिनियम 1966 चे कलम 85 अन्वये 100 रुपयाचे बाँडवर नोटरी करून वाटणीपत्राच्या आधारे फेरफारसाठी अर्ज दिला होता. तसेच मा. उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठ यांनी दिलेला आदेश क्र.2420/2022 दि.04/01/2022 ची प्रत सोबत दिली होती व संबंधित प्रकरणात तलाठी सज्जा सावरगाव थोट यांनी फेरफारची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली होती.
माझ्याकडून पैसे उकळण्यासाठी शासन आदेशाचा अपमान करून व मा. उच्च न्यायालयाचा अपमान करून मंडळ अधिकारी हाडोळती यांनी बेकायदेशीररित्या फेरफार नामंजूर केला आहे. शेतकरी अनुदान निधी अपहरण प्रकरणी यापूर्वी निलंबीत मंडळ अधिकारी हाडोळती हे शेतकऱ्यांना फेरफार प्रकरणी अडवून पैशाची मागणी करित आहेत. कार्यालयीन वेळेत ते हाडोळती येथे उपलब्ध नसतात व अहमदपूर तहसिल कार्यालयात बसून येणाऱ्या शेतकऱ्यांची पिळवणूक ते करतात. त्यांनी माझ्याकडे फेरफार मंजूरीसाठी 50,000/- रुपयांची मागणी केली आहे. ते अहमदपूर तालुक्यातील रहिवासी असल्यामुळे तहसिलदार व उपजिल्हाधिकारी यांनाही जुमानत नाहीत व वारंवार बदली करून अहमदपूर तालुक्यातच कार्यरत आहेत. यापूर्वी त्यांचे तलाठी पदाचा कार्यकाळपण अहमदपूर तालुक्यातच झालेला आहे.
रेणापूर तालुक्यात गेल्याच महिन्यात शेतकऱ्यांना फेरफारसाठी 1,00,000/- रुपये रक्कम मागितल्या प्रकरणी सदर शेतकऱ्याने आत्महत्या केली असून संबंधित तलाठ्याने आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी तलाठ्याविरुद्ध पोलिस ठाणे रेणापूर येथे गुन्हा दाखल झाला आहे. याची नोंद घेऊन महसूल अधिनियम व उच्च न्यायालयाच्या आदेशास पायदळी तुडवून बेकायदेशीररित्या माझा फेरफार नामंजूर करणाऱ्या मंडळ अधिकाऱ्याविरुद्ध तात्काळ चौकशी करून माझा फेर मंजूर करून द्यावा अन्यथा मंडळ अधिकाऱ्याच्या जाचास कंटाळून आपल्या कार्यालयासमोर दि. 21/03/2023 रोजी मी आत्मदहन करणार आहे याची नोंद घ्यावी असे निवेदन लातुर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी बि.पि पृथ्वीराज यांना दिले आहे.
