प्रत्येक ठिकाणी मराठीचा आग्रह धरला पाहिजे – ह.भ.प‌. डॉ. अनिल महाराज मुंढे

प्रत्येक ठिकाणी मराठीचा आग्रह धरला पाहिजे - ह.भ.प‌. डॉ. अनिल महाराज मुंढे

अहमदपूर (गोविंद काळे) : मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी केंद्र सरकारकडे कित्येक वर्षांपासून अभ्यासकांनी पुराव्यानिशी साकडे घातलेले असताना देखील केंद्र सरकार त्याकडे अक्षम्य दुर्लक्ष करीत असून, यापुढे मराठी भाषेला राजमान्यता मिळविण्यासाठी मराठी माणसाने प्रत्येक ठिकाणी आग्रह धरला पाहिजे, असे प्रतिपादन मराठी भाषेचे अभ्यासक ह.भ.प डॉ. अनिल महाराज मुंढे यांनी केले. येथील महात्मा फुले महाविद्यालयात प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या ‘मराठी भाषा गौरव दिन’ कार्यक्रमाच्या अध्यक्षपदावरून ते बोलत होते. यावेळी डॉ. मारोती कसाब, डॉ. सतीश ससाणे, डॉ. प्रशांत बिरादार, डॉ. बब्रुवान मोरे, डॉ. पांडुरंग चिलगर, डॉ. संतोष पाटील, प्रा. प्रकाश गायकवाड, अजय मुरमुरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

पुढे बोलताना डॉ. मुंढे म्हणाले की, मराठी साहित्याला प्रचंड मोठी परंपरा असून, लाखो ग्रंथांमधून मराठी भाषेचे महत्त्व दिसून येते. या भाषेचे सखोल संशोधन होणे आवश्यक असून, नवनवीन शब्दाविष्कार विद्यार्थ्यांनी जाणून घेतले पाहिजे, असेही ते यावेळी म्हणाले. कार्यक्रमाच्या आरंभी कवी कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या आविष्कारच्या ‘मराठी भाषा गौरव विशेषांकाचे ‘ प्रकाशनही करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन डॉ. बब्रुवान मोरे यांनी केले तर आभार डॉ. मारोती कसाब यांनी मानले. याप्रसंगी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!