शिवनेरी चषकाचा बक्षीस वितरणाचा सोहळा संपन्न
देवणी (रणदिवे लक्ष्मण) : देवणी येथे वस्ताद लहुजी साळवे यांच्या स्मृतिदिनानिमित्त व श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त “शिवनेरी चषक” टेनिस बॉल क्रिकेट सामन्याचे न्यू स्टार क्रिकेट क्लब देवणी व भीम पतंगे मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेची सुरुवात श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त १९ फेब्रुवारी या दिवशी करण्यात आली. उद्घाटन प्रसंगी देवणी नगरपंचायतचे उपाध्यक्ष अमितभैया शेषेराव मानकरी व पोलीस स्टेशन देवणीचे उपनिरीक्षक शेख यांच्या हस्ते करण्यात आले. सर्व सामने हे युट्युब लाईव्हद्वारे दाखवण्यात आले. या सामन्यात शहरी गट व ग्रामीण गट असे दोन विभाग करण्यात आले होते.
संघाची मर्यादा ठेवण्यातआली होती व या सामन्यात दोन्ही गटातील संघानी सहभाग नोंदवला. संपूर्ण सामन्यात २४ संघाने भाग नोंदविला होता. अंतिम चार सामन्यात उपउपांत्य फेरीत जगदंबा क्रिकेट क्लब कासारसिरशी व रामभाऊ क्रिकेट क्लब धनेगाव यांच्यात सामना रंगला या सामन्यात रामभाऊ क्रिकेट क्लब, धनेगाव विजयी होऊन उपांत्य फेरीत पोहोचला व उपांत्य फेरीत शिवनेरी स्पोर्ट्स क्लब देवणी यांच्याविरुद्ध त्यांचा सामना झाला व त्यात देखील त्यांनी आपला विजय नोंदविला. अंतिम सामना हा एम.बी. स्पोर्ट क्लब मादलापूर संघासोबत झाला व त्यात देखील ते विजयी ठरले. अशाप्रकारे रामभाऊ क्रिकेट क्लब धनेगाव या संघाने अंतिम सामन्यात विजयी होऊन प्रथम पारितोषिक ६१ हजार रुपये व चषक पटकावले व द्वितीय पारितोषिक एम. बी. स्पोर्ट क्लब मादलापूर संघाने ३५ हजार रुपये व चषक पटकावला. तर तृतीय पारितोषिक १५ हजार रुपये शिवनेरी स्पोर्ट क्लब देवणी यांनी पटकावले. प्रथम पारितोषिक न्यूस्टार क्रिकेट क्लब देवणीच्या वतीने श्रीकांत देवणीकर यांच्या तर्फे व गणेश भाऊ कांबळे यांच्या उपस्थितीत देण्यात आले. तर द्वितीय पारितोषिक बुद्धवासी अंकुश नारायण पतंगे यांच्या स्मरणार्थ भीम पतंगे यांच्या वतीने देण्यात आले तर तृतीय पारितोषिक अॅड. राजेश सूर्यवंशी यांच्या वतीने देण्यात आले. मॅन ऑफ द सिरीज अटलजी धनुरे यांच्यातर्फे चषक व २१०० रुपये देण्यात आले. मॅन ऑफ द सिरीज व मॅन ऑफ द मॅच धनेगावचे प्रसिद्ध खेळाडू डी के यांनी पटकावला.
मॅन ऑफ द मॅच रवी गायकवाड ग्रामपंचायत सदस्य औराद शहाजनी यांच्यातर्फे ११०० रुपये व चषक देण्यात आले. सामन्याच्या यशस्वीतेसाठी अनिल कांबळे, कैलास कांबळे, संदीप सूर्यवंशी, शिवा सूर्यवंशी, रितेश सूर्यवंशी, आजीम तांबोळी, गजेंद्र कांबळे, आकाश सूर्यवंशी, दीपक कांबळे, नागेश थोरे, विक्रम जाधव, भीम बोरे, राहुल यांनी परिश्रम घेतले. विशेष सहाय्यक म्हणून गट शिक्षणाधिकारी व्यंकटराव बोईनवाड, राजेंद्र वजनम, बाबू तुळजापुरे, पिंटू कांबळे यांचे योगदान लाभले. सर्व सामन्यादरम्यान सर्व संघाच्या खेळाडूंना पिण्याचे फिल्टर पाण्याची व्यवस्था चिदानंद स्वामी यांच्या मार्फत मोफत करण्यात आली.
