तरुणांच्या सर्वांगीण विकासासाठी शिबिरे महत्वाची-माजी सभापती चिलकुरे
उदगीर (एल.पी.उगीले) : तरुणांच्या हाती देश घडविण्याची ताकद असते. तरुणांनी आपली जबाबदारी ओळखून देश हितासाठी कार्य केले पाहिजे. देशाला महासत्ता म्हणून पुढे जायचं असेल तर, कृषी आणि शिक्षण या क्षेत्राचा विकास होणे अत्यंत गरजेचे आहे. शिक्षणातुन तरुणांच्या बौद्धिक विकासाला गती मिळते, पण तरुणांच्या सर्वांगीण विकासासाठी शिबिरे अत्यंत महत्वाची असतात. असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती गोविंदराव चिलकुरे यांनी केले. उदगीर येथील स्वामी विवेकानंद महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने हत्तीबेट पर्यटन स्थळाच्या गडावर आयोजित केलेल्या विशेष वार्षिक शिबीराचे उदघाटन गोविंदराव चिलकुरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. धनंजय गौड होते.तर प्रमुख पाहुणे म्हणून पत्रकार व्ही. एस. कुलकर्णी,राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. अमर तांदळे, पत्रकारिता व माध्यमशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. राहुल पुंडगे, महाविद्यालयातील परीक्षा प्रमुख डॉ, एस. एन. जाधव, कानेगावचे सरपंच तुकाराम लांडगे , चेअरमन सतीश एडले, अर्जुन सुरवसे,डॉ. व्ही. एस. चव्हाण, प्रा. हणमंत सूर्यवंशी,तातेराव कांबळे यांची उपस्थिती होती.
पुढे बोलताना चिलकुरे म्हणाले की, शिबारातून तरुणांना समाज जीवनाची ओळख होते. मैत्री, श्रमदान, विविध विषयांवर चर्चा, महापुरुषांचे कार्य व विचार इ. माहिती मिळते. माणसं घडविण्यासाठी अशी शिबिरे महत्वाची असतात असेही ते म्हणाले. या प्रसंगी व्ही .एस. कुलकर्णी यांनी हत्तीबेट या ऐतिहासिक स्थळाबाबत विद्यार्थ्यांना माहिती दिली. अध्यक्षीय समारोपात डॉ.धनंजय गौड यांनी राष्ट्रीय सेवा योजनेचे महत्व आणि महाविद्यालयाची भूमिका या विषयी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रा. अमर तांदळे तर आभार प्रा. राहुल पुंडगे यांनी मानले.
