आठ हजारांची लाच स्वीकारताना सहाय्यक अधीक्षक एसीबीच्या जाळ्यात
लातूर (कैलास साळुंके) : लातूर येथील जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय येथे सहाय्यक अधीक्षक पदावर कार्यरत असलेल्या अभिमन्यू सुरवसे यांना आठ हजारांची लाच स्वीकारताना एसीबीने रंगेहात अटक केली आहे.
सविस्तर माहिती अशी की, लातूर येथील जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय येथे सहाय्यक अधीक्षक पदावर कार्यरत असलेल्या अभिमन्यू धोंडीबा सुरवसे (वय 51) रा. नाथ नगर, लातूर यांनी तक्रारदार पुरुष (वय 44) यांच्या आई – वडिलांच्या उपचाराचे 3,12,564 रुपयांचे वैद्यकीय प्रतिपूर्ती देयकाची तांत्रिक मंजूर करून घेतो म्हणून शासकीय शुल्का व्यतिरिक्त 5 टक्के प्रमाणे लाचेची मागणी केली व तडजोडीअंती आठ हजार रुपये लाच घेण्याचे मान्य केले. तक्रारदाराने दिलेल्या तक्रारी वरुन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पडताळणी करत यशस्वी सापळा रचत दि. 8 एप्रिल रोजी साडे चार वाजताच्या सुमारास जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयात असलेल्या लेखा विभागात आठ हजारांची लाच स्वीकारताना लातूर एसीबीने सहाय्यक अधीक्षकास रकमेसह ताब्यात घेतले आहे.
सदरची कारवाई ही लाचलुचपत प्रतिबंधक नांदेड विभागच्या पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप अधीक्षक माणिक बेद्रे, पोलीस निरीक्षक बाबासाहेब काकडे व इतर लातूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे कर्मचारी यांनी काम पाहिले.