कुसुमाग्रज हे मराठी मनाचा मानबिंदु – धनंजय गुडसूरकर
परभणी (एल.पी.उगीले) : “कुसुमाग्रजांनी केवळ साहित्यच लिहीले नाही तर आपल्या जगण्यातून आदर्श घालून दिला,कुसुमाग्रज हे मराठी मनाचा मानबिंदु आहेत,त्यांच्या गौरवार्थ होणारा साहित्योत्सव हा निश्चितच अभिमानाचा विषय आहे.” असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे सदस्य धनंजय गुडसूरकर यांनी केले.ज्ञानसाधना प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित मराठी भाषा संवर्धन सप्ताहाच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते.अध्यक्षस्थानी प्रतिष्ठानच्या सचिव व सिनेट सदस्य सौ.शितल सोनटक्के होत्या, तर प्रमुख पाहूणे म्हणून कथाकार बबन आव्हाड उपस्थित होते.
प्रारंभी दीपप्रज्वलन करून गुडसूरकर यांनी कार्यक्रमाचे उद्घाटन केले.”मायभाषा ही ज्ञानभाषा म्हणून आपण गांभीर्याने घेतली पाहिजे.”असे गुडसूरकर म्हणाले.कथाकार बबन आव्हाड यांनी कथा,कवितांच्या माध्यमातून मराठी भाषेची महती सांगितली.अध्यक्षीय समारोपात सौ.शितल सोनटक्के यांनी मराठी भाषेच्या गौरवासाठी हा उपक्रम असल्याचे सांगून साहित्यिक हे समाजाचे भूषण असल्याचे सांगितले.मराठी गौरव दिनाचे औचित्य साधून घेण्यात आलेल्या निबंधलेखन स्पर्धा,वक्तृत्व स्पर्धा,काव्यवाचन व काव्यलेखन स्पर्धांचे पारितोषिक वितरण यावेळी करण्यात आले.आर.एस.चाफे यांनी सुत्रसंचालन तर जी.पी.गायकवाड यांनी आभार मानले. ज्ञानसाधना च्या मराठी भाषा संवर्धन सप्ताहात व्याख्यान,काव्यवाचन,नाटक आदी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
