संत ज्ञानेश्वर विद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा
अहमदपूर (गोविंद काळे) : अंधश्रद्धेला दूर सारून विज्ञानाची कास धरावी.शिक्षकांनी, पालकांनी विद्यार्थ्यांच्या अंगी जिज्ञासा, वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करावा असे जाहीर आवाहन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य सरचिटणीस हरिदास तम्मेवार यांनी संत ज्ञानेश्वर विद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त बोलताना केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका आशा रोडगे, प्रमुख मार्गदर्शक म्हणून सेवानिवृत्त केंद्रप्रमुख ह.भ.प. हरिदास तम्मेवार, ग्रामीण रुग्णालयाच्या डॉ.पूजा सुदेवाड, लिनेस क्लबच्या अध्यक्षा मीना तोवर सह मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी भारतरत्न सी.व्ही.रमण यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. विज्ञान गीताने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. हरिदास तम्मेवार यांनी पुढे बोलताना विज्ञान विषयक छोट्या छोट्या गोष्टी सांगितल्या. अंधश्रद्धेवर विश्वास ठेवू नका असे सांगत एका कानात दूध टाकून दुसऱ्या कानातून दूध काढणे असे प्रयोग करून दाखवून त्याचा वैज्ञानिक दृष्टिकोन समजून सांगितला. डॉ. पूजा सुदेवाड यांनी आपले मनोगतात विद्यार्थ्यांना आरोग्याविषयी व आहारा विषयी माहिती सांगितली. अध्यक्षीय समोरप प्रसंगी आशा रोडगे म्हणाल्या की, स्वतःची प्रगती असो वा समाजाची प्रगती किंवा देशाची प्रगती विज्ञानामुळेच होते. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात विज्ञान शिक्षिका मीना तोवर यांनी बारा भारतीय शास्त्रज्ञांची ओळख करून दिली. सूत्रसंचालन सतीश साबणे यांनी केले तर आभार विज्ञान शिक्षिका कोमल मरेवाड यांनी मानले.पसायदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.
