उदगीर जिल्हा निर्मितीसाठी आ.संजय बनसोडे यांची मुख्यमंत्र्याकडे मागणी

उदगीर जिल्हा निर्मितीसाठी आ.संजय बनसोडे यांची मुख्यमंत्र्याकडे मागणी

उदगीर (एल.पी.उगीले) : गेल्या पाच दशकापासून उदगीर जिल्हा व्हावा, ही समस्त जनमताची मागणी आहे. ही मागणी पूर्णत्वास यावी, याकरिता वेळोवेळी उदगीर शहरात विविध बैठका, निवेदने, आंदोलने, मोर्चे, रास्ता रोको, जाहीर सभा घेण्यात आल्या आहेत.

महाराष्ट्र राज्य स्थापने नंतर तत्कालीन उस्मानाबाद जिल्ह्यात समाविष्ट असलेल्या उदगीर तालुक्याला जिल्ह्याचा दर्जा मिळावा, ही मागणी जोर धरत होती. तत्कालीन महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते तथा सीमा भागातील आमदार कै. बापूसाहेब पाटील एकंबेकर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा निर्मितीसाठी भव्य मोर्चा काढण्यात आला होता. तद्नंतरच्या काळात माजी खा. तुळशीराम कांबळे व माजी आ. टी. पी. कांबळे यांनी हा विषय मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा केला. शिवाय माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर व माजी मुख्यमंत्री कै. विलासरावजी देशमुख , माजी उपमुख्यमंत्री कै. गोपीनाथराव मुंडे यांनीही या प्रश्नांसाठी मदतीचा हात पुढे केला होता. शिवाय माजी राज्यमंत्री बाळासाहेब जाधव , माजी आ. मनोहर पटवारी, माजी आ. गोविंद केंद्रे या तत्कालीन लोकप्रतिनिधींनी आपआपल्या काळात उदगीर जिल्हा निर्मितीसाठी पुढाकार घेतला होता.

उदगीर जिल्हा निर्मिती व्हावी, यासाठी उदगीर तालुक्यासह बाजूच्या नांदेड जिल्ह्यातील अनेक तालुक्यातील नागरिकांनी मागणी लावून धरली आहे. मागच्या काळात हा जिल्हा व्हावा, यासाठी मोठा लोकलढा उभारला जात असतानाच तत्कालीन उस्मानाबाद जिल्हा विभाजित करून लातूर जिल्ह्याची निर्मिती करण्याचा प्रस्ताव पुढे आला. मात्र त्यावेळी उदगीर जिल्हा निर्मिती होण्यासाठी उदगीरची राजकीय ताकद कमी पडली, व लातूरला मोठे राजकीय पाठबळ मिळाल्याने लातूर जिल्हा निर्मिती साठी शासन दरबारी प्रयत्न सुरू झाले. या काळात उदगीर जिल्हा करावा म्हणून उदगीरच्या जनतेने लातूर जिल्हा निर्मितीसाठी पाठिंबा देत असताना भविष्य काळात जेव्हा केव्हा लातूरचे विभाजन होऊन नवीन जिल्ह्याची निर्मिती होईल, तेव्हा उदगीर जिल्हा निर्मिती केली जाईल. असा शब्द तत्कालीन शासनकर्त्यांनी दिला होता.आज चाळीस वर्षाहून अधिक काळापासून उदगीर जिल्हा निर्मितीचा लढा लढला जात आहे. वेळोवेळी विविध राजकीय, सामाजिक संघटनाची स्वाक्षरी मोहीम असो, व्यापाऱ्यांचा मूक मोर्चा असो अशा विविध सनदशीर मार्गानी आंदोलन करून लोकलढा लढला जात आहे. हा लोक लढा लढला जात असतानाच नांदेड जिल्हयातील मुखेड तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतीनी उदगीर जिल्हा निर्मिती साठी ठराव देऊन पाठिंबा दर्शविला आहे. उदगीर, जळकोट, देवणी या तिन्ही तालुक्यातील सर्वच ग्रामपंचायतींचे देखील जिल्हा निर्मितीसाठी ठराव देण्यात आले आहेत. उदगीर तालुक्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने एक लाख नागरिकांच्या स्वाक्षरीची मोहीम राबविण्यात आली. माजी आ. स्व. चंद्रशेखर भोसले यांच्या नेतृत्वाखाली उदगीर जिल्हा निर्मीती कृती समितीच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेऊन हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा केला होता. नंतरच्या काळात माजी आ. सुधाकर भालेराव यांनीही उदगीर येथील जनतेची भावना लक्षात घेऊन विधानभवनात आवाज उठविला होता. मागील काळात उदगीर नगर परिषद व लातूर जिल्हा परिषदेने उदगीर जिल्हा निर्मितीचा ठराव संमत केला आहे. शिवाय उदगीर येथे पार पडलेल्या मराठवाडा साहित्य संमेलन व अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात उदगीर जिल्हा निर्मिती करण्याचे ठराव घेण्यात आले आहेत. तसेच जिल्हयाच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेले सर्व शासकिय कार्यालयांच्या इमारती जिल्ह्याच्या दृष्टीने मंजूर होऊन आजतागायत पुर्णत्वास जात आहेत. तसेच सर्व महामार्ग व इतर रस्ते अतिशय दर्जेदार झाले असुन जिल्हा निर्मीती करिता सर्व बाबी पोषक आहेत. तसेच तत्कालीन औरंगाबाद येथे माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या उपस्थितीत दि. 09 जानेवारी 2020 रोजी पार पडलेल्या बैठकीत ही आग्रही मागणी केली असता माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या निर्देशानुसार उदगीर जिल्हा निर्मिती साठी विभागीय आयुक्त, औरंगाबाद यांच्या कार्यालयाकडुन जिल्हा निर्मीतीचा व उदगीर येथे प्रशासकिय इमारतीचा प्रस्ताव पाठविण्याचे निर्देश देण्यात आले होते.

गेल्या अनेक वर्षांपासून असलेली ही मागणी पूर्णत्वास जावी याकरिता आ.संजय बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच उदगीर जिल्हा निर्मीती कृती समिती पदाधिकारी, व्यापारी, नागरीक, सामाजिक कार्यकर्ते, सर्व राजकिय पक्षांचे प्रतिनिधी यांच्या समवेत व्यापक बैठक पार पडली. या बैठकीत उदगीर जिल्हा निर्मितीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी व्यापक जन आंदोलन उभारण्यात यावे. असा निर्णय सर्वपक्षीय नेते व नागरीकांनी घेतला असून त्याचाच भाग म्हणून या उदगीर मतदार संघाचा आमदार म्हणून आ.बनसोडे यांनी लोकप्रतिनिधी या नात्याने विधानभवनाच्या पायऱ्यावर बसुन उदगीर जिल्हा निर्मीतीसाठी आंदोलन करुन सरकारने या सर्व व्यापक बाबीचा विचार करुन उदगीर जिल्हा निर्मीतीसाठी आपल्या स्तरावर निर्णय घ्यावा. अशी आग्रही मागणी माजी मंत्री आ.संजय बनसोडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्यावेळी विधानभवनाच्या पाय-यावर ठिय्या करुन सरकारचे लक्ष वेधले व लेखी निवेदनाव्दारे मागणी केली आहे.

About The Author

error: Content is protected !!