महिलांनी आर्थिक स्वावलंबनासाठी उद्योगाकडे वळावे – सौ.दिपाली औटे
उदगीर (एल. पी. उगीले) : सध्याच्या प्रचंड महागाईच्या काळात आपल्या कुटुंबाला आर्थिक स्थैर्य देण्याच्या दृष्टीने, मध्यमवर्गीय कुटुंबातील महिलांनी आर्थिक स्वावलंबनासाठी लघु उद्योगाकडे वळणे गरजेचे आहे. आपल्या फावल्या वेळात आपल्या अंगी असलेल्या कलागुणांचा योग्य वापर करून, चार पैसे मिळवता आले तर ते चांगलेच आहे. उदगीर शहरात असाच प्रयत्न गीतांजलीताई सूर्यवंशी या करत आहेत. एका अर्थाने महिला सक्षमीकरणाचा पाया रचण्यासाठी त्या प्रयत्न करत आहेत. अशा महिलांचा इतरांनी आदर्श घ्यावा. असे विचार राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या नेत्या सौ. दिपालीताई औटे यांनी व्यक्त केले.
त्या उदगीर शहरातील अन्वि द ब्युटी सलूनच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुखअतिथी म्हणून बोलत होत्या. याप्रसंगी सौ. मोहिनीताई आचोले, राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते अभिजीत औटे, कोदळीचे सरपंच लहू कांबळे ,युवा नेते दिनकर बिरादार, मेघराज बिरादार ,उमाकांत बिरादार ,उमाकांत दोडके ,मधुकर बिरादार ,सचिन पाटील ,पद्माकर बिरादार ,ज्ञानेश्वर कोतागडे ,गणेश बिरादार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना दिपालीताई औटे यांनी स्पष्ट केले की, महिलांनी पुढाकार घेऊन लघुउद्योग सुरू करावेत जेणेकरून आर्थिक सबल होता येईल. त्यासोबतच आपल्या फावल्या वेळाचाही चांगला फायदा होईल. नव्या पिढीसमोर आदर्श निर्माण केला जाईल, कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळताना अनेक वेळेस महिलांची आर्थिक गोची होत असते. जर स्वतःचे उद्योग उभा राहिले तर तशा अडचणीवर मात करता येईल. श्रम प्रतिष्ठा जपली पाहिजे. कोणतेही काम हे लहान मोठे नसते, हा गांधीजींचा विचार सर्वांनी लक्षात ठेवून काम करावे. असेही त्या म्हणाल्या. याप्रसंगी सर्व मान्यवरांनी अन्वी द ब्युटी सलून या उद्योगाला शुभेच्छा दिल्या.
