लोकप्रतिनिधी, शासन, प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे बस स्थानकावर प्रवाशांची गैरसोय – रोडगे

लोकप्रतिनिधी, शासन, प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे बस स्थानकावर प्रवाशांची गैरसोय - रोडगे

उदगीर (एल.पी.उगीले) : उदगीर बस आकारात प्रचंड गैरसोयी असल्यामुळे प्रवासी, अबाल, वृद्ध, महिला यांचे प्रचंड हाल होत आहेत. या गोष्टीकडे लोकप्रतिनिधी, शासन, प्रशासन किंवा बस आगारातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे किंवा नव्याने बसस्थानक बांधणाऱ्या कंत्राटदाराचे याकडे लक्ष नाही. त्यामुळे आता परेशानीत असलेल्या प्रवाशांनी दाद तरी कोणाला मागावी? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

वास्तविक पाहता नवीन इमारत बनवत असताना, जुनी इमारत पाडल्यानंतर पर्यायी व्यवस्था करणे गरजेचे होते. मात्र तसे काहीही झाले नाही. एक खुराडे टाईप पत्र्याचे शेड उभे केले आहे. सद्यस्थितीत उन्हाळ्याची तीव्रता हळूहळू वाढू लागली आहे. तशात प्रवाशांना बसायला सोय नसणे, लहान बालक, महिला, वयोवृद्ध प्रवासी या सर्वांचेच बेहाल चालू आहेत. उदगीर तालुका आंध्र, कर्नाटका, महाराष्ट्र, तेलंगणा या चार राज्याच्या सीमेवर असल्याने मोठी बाजारपेठ आहे. लातूर नंतर उदगीरच मोठी बाजारपेठ असल्याने व्यापाराच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात लोकांची ये जा असते. सद्यस्थितीत बसस्थानकात थांबायला ही जागा नाही. प्रचंड धुराळा आणि सर्वत्र खड्डेच खड्डे ! अशी बस स्थानकाची स्थीती झाली आहे. या परिस्थितीकडे लोकप्रतिनिधी म्हणून आमदारांनी लक्ष घालने गरजेचे होते, मात्र लक्ष घातले जात नसल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष बसवराज रोडगे यांनी केला आहे. बसस्थानकाच्या कंत्राटदाराने प्रवाशांना वाऱ्यावर सोडून आपले दुकान थाटण्याचा केलेला प्रयत्न उदगीरकरांसाठी आणि आजूबाजूच्या ग्रामीण भागातील जनतेसाठी त्रासदायक असल्याचेही बसवराज रोडगे यांनी आपल्या निवेदनात नमूद केले आहे. बस आगाराचे प्रमुख अधिकारी तसेच संबंधित खात्याचे जिल्हा पातळीवरील अधिकारी यांना भेटून यासंदर्भातली तक्रारी त्यांनी दिली आहे. विशेष बाब म्हणजे रात्रीच्या वेळी प्रवाशांनी कुठे थांबावे? कसे थांबावे ? कारण या ठिकाणी विद्युतची सुविधा नाही. त्यामुळे भुरट्या चोऱ्यांचे प्रमाण वाढू शकते. याची काळजी घेणे गरजेचे असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे. काही महिन्यातच पावसाळा सुरू होईल, आणि मग सर्वत्र पाण्याचे डबके आणि चिखल निर्माण होईल. त्यावेळी तरी प्रवाशांना थांबण्याची व्यवस्था केली जाईल काय? शासकीय पातळीवरून किंवा लोकप्रतिनिधीच्या पातळीवरून या बाबीकडे गांभीर्याने लक्ष दिले जाईल का? असाही प्रश्न रोडगे यांनी उपस्थित केला आहे.

About The Author

error: Content is protected !!