स्पर्धेच्या युगात व्यक्तिमत्त्व विकासाला अनन्यसाधारण महत्त्व – डॉ.उमाकांत पाटील

स्पर्धेच्या युगात व्यक्तिमत्त्व विकासाला अनन्यसाधारण महत्त्व - डॉ.उमाकांत पाटील

उदगीर (एल.पी.उगीले) : प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपल्या व्यक्तिमत्त्व विकासाकडे लक्ष देणे गरजेचे आहे.शिक्षणा सोबत एक व्यक्ती म्हणून आपण समाजात कसे उभे राहिले पाहिजे? यासाठी व्यक्तिमत्त्व विकासचा अभ्यास करणे आवश्यक आहे.आपल्या व्यक्तिमत्त्वातून आपली ओळख होत असते. त्यामुळे विद्यार्थ्याना स्वतःमध्ये काय चांगले आहे, काय वाईट आहे? हे जाणून घेतले पाहिजे.आपल्या बोलण्यात आणि वागण्यात सकारात्मकता आणली पाहिजे. जेणे करून आपला व्यक्तिमत्त्व विकास होण्यास मदत होईल.असे प्रतिपादन स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळाचे शैक्षणिक संचालक डॉ. उमाकांत पाटील यांनी केले.

उदगीर येथील स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळ संचलित स्वामी विवेकानंद महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आयोजित विशेष वार्षिक शिबीर मौजे देवर्जन (हत्तीबेट) ता. उदगीर येथे होत आहे. दि.01/03/2023 रोजी सकाळच्या सत्रात डॉ.पाटील हे ‘व्यक्तिमत्त्व विकास’ या विषयावर बोलत होते.कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून डॉ. एस. एन. जाधव होते, तर महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. धनंजय गौड,राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. अमर तांदळे,पत्रकारिता विभागाचे प्रमुख प्रा. राहुल पुंडगे, डॉ. एस. व्ही. चव्हाण, प्रा. आकाश कांबळे, तातेराव कांबळे याची प्रमुख उपस्थिती होती.

पुढे बोलताना डॉ.पाटील म्हणाले की, प्रत्येक विद्यार्थीला आपले स्वतःचे मत मांडता आले पाहिजे.नवीन लोकांना भेटून विचारांची देवाण-घेवाण करता आली पाहिजे. वाचन क्षमता वाढविली पाहिजे, एक चांगला श्रोता झालं पाहिजे.इतरांचा आदर केला पाहिजे. आपली शरीरयष्टी सुधारली पाहिजे, जेणे करून आपला प्रभाव इतरांवर पडेल.यासर्व बाबी व्यक्तिमत्त्व विकासासाठी महत्वाच्या असून यांना अनन्यसाधारण महत्व आहे, असे ही ते म्हणाले. यावेळी अध्यक्षीय मनोगतात डॉ. एस एन जाधव यांनी आपले अनुभव व्यक्त करीत व्यक्तिमत्त्व विकास कसा साधला हे उदाहरण देऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थी पृथ्वीराज देवणीपुरगे यांनी केले, तर आभार सुरज माळेगावे यांनी मानले.

About The Author

error: Content is protected !!