प्रत्येक क्षणात असावी मराठी… जपावी मराठी …स्मरावी मराठी… जगावी मराठी…!

प्रत्येक क्षणात असावी मराठी… जपावी मराठी …स्मरावी मराठी… जगावी मराठी…!

अहमदपूर (गोविंद काळे) : ‘सुखदुःखाच्या प्रत्येक क्षणात
असावी मराठी… जपावी
मराठी…स्मरावी मराठी…
जगावी मराठी…
चंद्रसूर्य तारे आहेत जोवर
तोवर धन्य होऊन राहावी मराठी..!’
अशा आवाहनात्मक, भावपूर्ण आणि आपल्या लयबद्ध रचनेतून कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातल्या राजापूर तालुक्यातील एका आदिवासी पाड्यातून मनीषा सूर्यवंशी या महात्मा फुले महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थीनी व आघाडीच्या कवयित्रीने मराठीचा गोडवा सादर करून मनमनात मराठीची अस्मिता जागृत केली. निमित्त होते कवी कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त व मराठी भाषा गौरव दिनाचे.
येथील महात्मा फुले महाविद्यालयात आभासी पद्धतीने महाराष्ट्रातील १७ निमंत्रित कवींचे कवी संमेलन जोरदार रंगले..!
महाविद्यालयाचे कुशल प्रशासक व महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध लेखक, समीक्षक प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मराठी विभागाच्या वतीने राज्यस्तरीय कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. कवी कुसुमाग्रज यांना आदरांजली वाहून या कवी संमेलनाची सुरुवात ‘वंदे मातरम’ या गीताने झाली. या कवी संमेलनाचे वैशिष्ट्य म्हणजे चांद्यापासून ते बांद्यापर्यंत महाराष्ट्रातील अनेक नामवंत कवी या कवी संमेलनात सहभागी झाले होते.
नांदेड जिल्ह्यातील लोह्याचे नवोदित कवी संतोष चमकुरे यांनी –
‘ तुला जे समजायचे
ते तू समजून घे
आहे जे वास्तव जगणे तेच
प्रिय तू जाणून घे ‘
ही नितांत सुंदर गझल सादर उपस्थित रसिकांची मने जिंकली. अहमदपूर परिसरातील पार या गावचे रहिवासी असलेले ग्रामीण कवी मुरारी कराड यांनी –
‘खेड्यापाड्यांमध्ये राहते माय
मराठी
पंढरीच्या वारीमध्ये गाते माय
मराठी’
ही नितांत सुंदर रचना सादर केली. तर अहमदपूरच्या मांडणी गावात जिल्हा परिषद शाळेवर शिक्षिका असलेल्या रंजना गायकवाड या आपल्या कवितेतून म्हणाल्या-
‘बारवांच्या बुडातला
फाकला पाषाण हा
धाव पावसा धाव
थकला रे जीव हा ‘
ही पावसाची आळवणी करणारी दर्दभरी रचना पेश केली.
विदर्भातील वर्धा येथून संमेलनात सहभागी असलेल्या मीरा निचळे यांनी-
‘तुझ्या आकाशी कुंचल्यात
आहेत तरी किती रंग
पृथ्वीला निरोप देण्या प्रत्येक
क्षणी येऊ दे नवे रंग ढंग ‘
ही भावगर्भ रचना खास शैलीत सादर करून कविसंमेलनास सुरूवात केली. अलकनंदा घुगे या छत्रपती संभाजी नगर मधील कवयित्रीने ‘माय मराठी ‘ ही मराठी भाषेचे गुणगान गाणारी कविता सादर करताना आपल्या सुंदर रचनेतून माय मराठीची महती गायली. याचबरोबर छत्रपती संभाजीनगर येथूनच सहभागी असलेल्या महात्मा फुले महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थिनी महादेवी चौकटे- कानघुले यांनी-
‘माझे माहेर अंधोरी
नाही भेटले रोज तरी
जावे वाटते कधीतरी
संस्काराची ती शिदोरी
असे माझे माहेर अंधोरी’
ही स्त्री सुलभ भानवांची अभिव्यक्ती करणारी कविता माहेरची ओढ, हुरहूर, नातेबंध आविष्कृत करणारी कविता सादर करून मने जिंकली. याच बरोबर ‘काव्य वर्षा’ या नुकत्याच प्रकाशित झालेल्या काव्यसंग्रहाच्या कवयित्री वर्षाताई लगडे- माळी यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करणारी आणि सध्याचे वास्तव उजागर करणारी चिंतनगर्भ कविता सादर करून रसिकांना अंतर्मुख केल्या.त्या म्हणाल्या की-
‘ सावित्रीमाई आमच्यासाठी
तुम्ही वेळ जरा काढा
तुम्ही शिकविलेल्या ज्ञानाचा
कसा वाचतोय आम्ही पाढा’
नवी मुंबई येथील कवयित्री वृषाली पंडित यांनी मराठी भाषेची महती गाणा-या ‘ कोंदण’ या कवितेतून-
‘माय मराठी भाषेचे लेते मी
गोंदण तिच्या नावाचेच आहे
आम्हा सर्वांभूती कोंदण ‘
अशी गौरवगाथा सांगितली.. याचबरोबर उदगीर येथील कवी भरतकुमार गायकवाड यांनी
‘ मला दिसली मराठी इंग्रजी
शाळेच्या पुढे ढसाढसा रडत
होती’
ही आजच्या वास्तवाचे चित्रण चितारणारी कविता सादर करून एक जळजळीत कटाक्ष टाकला. तर डॉ. व्यंकट सूर्यवंशी यांनी समकालीन वास्तवाचे भान देणारी-
‘ शेजारच्या हमीदवर सोबतच्या
कांबळेवर मांगाच्या
दानियलवर विद्रोही कवीवर
सीसीटीव्ही कॅमेरा डोळे राखून
पाहतोय मला माझा गाव
आमच्या अंगावर आल्यावनी
वाटतोय ‘
ही विद्रोही रचना सादर केली. महात्मा फुले महाविद्यालयातील भूगोल विभागाचे कवी डॉ. दिगंबर माने यांनी –
‘ हे महापुरुषांनो महावीरांनो,
तुमच्या धमन्यातून आमच्या
धमन्यात वाहणारे रक्त पुरते
गढूळ झाले आहे
आमच्या पिढ्या आता पुन्हा
अंधारात चाचपडत आहेत ‘
ही क्रांतीप्रवण कविता सादर केली. तर अजय मुरमुरे यांनी- ‘धरती आबा बिरसा मुंडा ‘ ही कविता सादर करताना म्हणाले-
‘आदिवासी जननायक झाला
धरती आबा देशाचा शूरवीर तो
होता जंगलाचा वीर केले त्याने
उलगुलान उलगुलान..!’ मीनाक्षी तवर यांनी महाराष्ट्रातच मराठीची होणारी परवड कशी होते ते व्यक्त करताना त्या कवितेतून म्हणाल्या-
‘ माय माझी मराठी काय तुझे
गं हाल …!
राष्ट्रात अव्वल असूनही का
होतात तुझे बेहाल…?
नाही विद्यापीठात स्थान अभिजात दर्जा कधी होईल पूर्ण
मराठमोळी आशा ..? ‘
ही शासन आणि समाजाला प्रश्न विचारणारी कविता सादर केली. अमिता पैठणकर यांनी-
‘फिरून परत तो काळ मला दे
पूर्वी इतकी जाण मला दे
एक प्रार्थना तुझ्याकडेही
स्मृतीभ्रंशाचे दान मला दे ‘
ही चिंतनगर्भ पातळीची उंची गाठणारी अप्रतिम कविता सादर केली. याचबरोबर अंबाजोगाईचे कवी ज्ञानेश पाटील, महात्मा फुले महाविद्यालयाचा विद्यार्थी कवी अमोल बनसोडे, डॉ. मारोती कसाब यांनीही या कवी संमेलनामध्ये आपल्या आशयघन कविता सादर केल्या. या कविसंमेलनाचा अध्यक्षीय समारोप प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांच्या वतीने उपप्राचार्य तथा शीघ्रकवी दुर्गादास चौधरी यांनी केला.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व कवींचा परिचय प्रो. डॉ. अनिल महाराज मुंढे यांनी करून दिला तर सूत्रसंचालन करून आभार डॉ. मारोती कसाब यांनी मानले. गुगल मीटवर झालेल्या या कवी संमेलनास महाराष्ट्राच्या विविध विभागातील रसिक व विविध महाविद्यालयांतील प्राचार्य, प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी व काव्यरसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!