हरभरा विक्रीपूर्व नोंदणीचे पोर्टल अनेक केंद्रावर अद्याप सुरू नाही, शासनाकडून दिरंगाई
लातूर (एल.पी.उगीले) : राज्यात नाफेडच्या माध्यमातून किमान हमीदरानुसार (एम एस पी) नुसार हरभरा खरेदी 14 मार्चपासून सुरू होणार आहे, या अनुषंगाने विक्रीपूर्व नोंदणी ही 27 फेब्रुवारीपासून सुरू होईल असे शासनाने कळविले, परंतु नोंदणी पोर्टल अद्यापही कांहीं केंद्रावर सुरू केले नसल्याने ऑनलाइन नोंदणीची कामे रखडलेली आहेत. शेतकरी मात्र नोंदणीसाठी तगादा लावत असल्याचे चित्र खरेदी केंद्रावर दिसून येत आहे.परंतु नाफेड कडून काही एस एल ए च्या संस्था वगळता पाच दिवसाचा कालावधी गेल्यानंतरही अद्याप अनेक खरेदी संस्थाचे पोर्टल सुरू केले नाही. यामुळे शेतकऱ्याची कागदपत्रे गोळा केलेल्या संस्थांना शेतकऱ्याची विक्रीपूर्व नोंदणी करण्यास अडचणी निर्माण झाल्या आहेत.अशी तक्रार राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक जिल्हा उपाध्यक्ष सुनील केंद्रे यांनी केली आहे.
लातूर जिल्ह्यात नाफेड व महा एपीसीच्या अंतर्गत 65 शेतकरी कंपन्यांच्या संस्थामार्फत खरेदी केंद्रावर शासकीय हमीभाव योजनेअंतर्गत हरभरा खरेदी केली जाते. मात्र यावर्षी नाफेड मार्फत जिल्ह्यातील मोजक्याच खरेदी केंद्राची ऑनलाइन पोर्टल चालू केले आहेत. उर्वरित खरेदी केंद्र ही सद्यस्थितीत प्रतिक्षेत आहेत, यामुळे लातूर जिल्ह्यातील शेतकरी हवाल दिल झाले आहेत. शासनाने हस्तक्षेप करून नाफेड मार्फत सुरू होणारी खरेदी प्रक्रिया चालू करावी अन्यथा शेतकरी तीव्र आंदोलन करतील असा इशाराही सुनील केंद्रे यांनी दिला आहे.
