लाल बहादूर शास्त्री प्राथमिक शाळेत जागतिक महिला दिनानिमित्त महिला मेळावा संपन्न
उदगीर (एल.पी.उगीले) : भारतीय शिक्षण प्रसारक संस्था,अंबाजोगाई संचलित लाल बहादूर शास्त्री प्राथमिक विद्यालयात जागतिक महिला दिनानिमित्त स्त्री शक्तींचा सन्मान करण्यासाठी माता-पालक संघातर्फे महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमासाठी अध्यक्षा म्हणून सौ.अश्विनी संजय देशमुख ,प्रमुख मार्गदर्शिका म्हणून सौ.डॉ.अस्मिता भद्रे व सौ.डॉ.मोहिनी आचोले उपस्थित होत्या,तसेच प्रमुख पाहुणे म्हणून मुख्याध्यापक अंकुश मिरगुडे, बालवाडी अध्यक्षा अंजलीताई नळगीरकर,विभाग प्रमुख सुधाकर पोलावार , सुरेखाबाई कुलकर्णी,माता-पालक संघ प्रमुख सौ.आशालता कल्लूरकर व बालवाडी प्रमुख सौ.छाया कुलकर्णी उपस्थित होते.
व्यासपीठावरील मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते प्रतिमा पूजन व दिपप्रज्वलन करण्यात आले.प्रमुख मान्यवर महिलांचा शाळेच्या वतीने शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.प्रमुख अतिथी डॉ.मोहिनी आचोले यांनी महिलांनी महिलांसाठी साजरा केलेला दिवस म्हणजेच जागतिक महिला दिवस होय.महिलांनी आपले आरोग्य सुदृढ बनवण्या साठी सकस आहार,व्यायाम, झोप, ध्यान व जीवनसत्त्वे यांना प्राधान्य दिले पाहिजे. वेळेवर आहार घ्या.रिकाम्या पोटी चहा पिऊ नये.चहामुळे भूक मंदावते, पित्ताच्या समस्या निर्माण होतात,चहा पिऊन आपण अनेक आजारांना आमंत्रण देत असतो.आपल्या आचरणातूनच आपली मुले घडत असतात,त्यासाठी महिलांनी आपले आचरण आदर्श ठेवले पाहिजेत.असे आरोग्याबद्दल खूप छान मार्गदर्शन केले. दुसऱ्या प्रमुख मार्गदर्शिका सौ.डॉ.अस्मिता भद्रे यांनी प्रत्येक क्षेत्रात स्त्रिया कामगिरी बजावत आहेत.त्या मिळालेल्या संधीचं सोनं करतात.प्रत्येक पुरुषांच्या यशात स्त्रीचा सिंहाचा वाटा असतो.सर्वांनी नारी शक्ती जाणून घेतली पाहिजे.आपल्या पाल्याच्या चांगल्या जडणघडणीत आईची भूमिका खूप महत्वाची असते.महिलांनी चॉकलेट,बेकरी उत्पादने, चिप्स,कुरकुरे देऊ नयेत.त्यामुळे भूक मंदावते.बाळाला आहाराच्या चांगल्या सवयी लावा.थोड्याथोड्या वेळाने आहार द्या.आपल्या पाल्यास उपाशीपोटी दुध देऊ नका.दुधाचं प्रमाण कमी करुन पोळी भाजी वाढवा,फळे यांचं प्रमाण वाढवा.असे मार्गदर्शन केले.
अध्यक्षीय समारोपपर भाषणात सौ.अश्विनी संजय देशमुख यांनी आपली हिंदू संस्कृती ही आदिशक्तीची पुजा करणारी संस्कृती आहे.आपल्या संस्कृतीत महिलांना अर्थपूर्ण नावे दिली जातात.स्त्री ज्योतीचा सन्मान घरोघरी झाला पाहिजे.स्त्री ही संस्काराची माता आहे.आपल्या पाल्यांना मोबाईल,कार्टुन्सच्या प्रलोभनापासून दूर करा.सर्व स्त्रियांचा राष्ट्रनिर्माणात खूप महत्त्वाचे योगदान आहे.आजची स्त्री सर्व क्षेत्रात प्रगतीपथावर आहे.तिचा सर्वत्र मान सन्मान झाला पाहिजे.जागतिक महिला दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या. सुत्रसंचलन सौ.श्रीदेवी कबाडे यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ. बोंडगेबाईंनी केले.स्वागत व परिचय श्रीमती निताताई वट्टमवार यांनी तर, वैयक्तिक पद्य सुरेखाबाई कुलकर्णी यांनी केले.आभार माता-पालक संघ प्रमुख सौ.आशालता कल्लूरकरबाईंनी मानले.महिला मेळावा यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.