भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचे अर्ज स्विकारण्यासाठी 14 मार्चपर्यंत मुदतवाढ
लातूर (प्रतिनिधी) : राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून प्रवेशास पात्र असूनही वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांतील विद्यार्थ्यांना मॅट्रिकोत्तर शिक्षण घेता यावे, यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना राबविण्यात येते. या योजनेंतर्गत भोजन, निवास व इतर शैक्षणिक सुविधा या विद्यार्थ्यांना स्वतः उपलब्ध करून घेण्यासाठी आवश्यक रक्कम संबंधित विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये थेट वितरीत करण्या येते.
सन 2022-23 या शैक्षणिक वर्षातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचे अर्ज 1 फेब्रुवारी 2023 ते 7 मार्च 2023 या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने समाज कल्याण सहाय्यक आयुक्त कार्यालयाकडून स्वीकारण्यात आले. सद्यस्थितीत विद्यार्थ्यांचा परीक्षा कालावधी असल्याने या योजनेचे अर्ज करण्यास मुदतवाढ देण्याची मागणी विद्यार्थ्यांकडून करण्यात येत होती. त्यानुसार या योजनेचे अर्ज स्वीकारण्यास 14 मार्च 2023 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज केलेले नाहीत त्यांनी त्वरित ऑनलाईन अर्ज करून त्याची हार्डकॉपी समाज कल्याण सहायक आयुक्त कार्यालयात सादर करावेत, असे आवाहन सहायक आयुक्त, समाज कल्याण, लातूर यांनी केले आहे.