मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत अहमदपूर तालुक्यातील ६.२ किमी लांबीच्या रस्ते दर्जोन्नती कामांना मंजुरी – आ. बाबासाहेब पाटील यांच्या पाठपुराव्याला यश!
अहमदपूर (गोविंद काळे) : तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग १५६ ते मोहगाव तालुका हद्द रस्ता आणि मांडणी ते हासरणी रस्ता कामासाठी मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत रस्त्याची दर्जोन्नती करण्यासाठी प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. या कामाबाबत अहमदपूर चाकूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बाबासाहेब पाटील यांनी वारंवार पाठपुरावा केला होता. या पाठपुराव्याला आज यश आले असून, याचा विशेष आनंद असल्याचे मत आमदार पाटील यांनी व्यक्त केले. याबद्दल खासदार सुधाकरजी शृंगारे, कार्यकारी अभियंता लवटे साहेब, उप अभियंता डी.आर मुकादम साहेब यांचे आभार देखील व्यक्त केले.
राष्ट्रीय महामार्ग १५६ ते मोहगाव तालुका हद्द रस्ता ३.३ किमी लांबी आणि मांडणी ते हासरणी रस्ता २.९४ किमी लांबी रस्ता या २ रस्त्यांच्या दर्जोन्नती कामांना मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत मंजुरी देण्यात आली आहे. तसेच उर्वरित प्रस्तावित रस्त्यांची मंजुरी प्रक्रिया अंतिम टप्यात असून लवकरच मंजुरी प्राप्त होईल, असे आ.बाबासाहेब पाटील यांनी सांगितले. मतदारसंघातील सर्व रस्ते उत्तम दर्जाचे व्हावे यासाठी मी कायमच प्रयत्नशील राहिलो आहे. अहमदपूर चाकूर तालुक्यातील सर्व रस्ते प्रमुख मार्गांना जोडले जावेत, जेणेकरून सर्वसामान्यांना दळणवळण सोयीस्कर होईल. मतदारसंघाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न आपण करत आहोत, असे मत आ.पाटील यांनी व्यक्त केले.