विकेंड लॉकडाऊनमुळे शंभर टक्के बंद ; दिवसभर बाजारपेठेत शुकशुकाट
व्यापाऱ्यांनी किराणा दुकाने ठेवली बंद
अहमदपूर (गोविंद काळे) : विकेंड लॉकडाउनमुळे शनिवारी दिवसभर अहमदपूर शहरातील सर्व दुकाने बंद होती.अत्यावश्यक सेवा वगळता संपुर्ण बाजारपेठ शटरडाउन झाल्यामुळे २२ मार्च, २०२० ची पुनरावृत्ती दिसली. औषध दुकाने वगळता शहरातील सर्व व्यवहार बंद होते. महिन्यातील दुसरा शनिवार असल्यामुळे सर्व बँका व शासकीय कार्यालयांना सुट्टी होती. त्यामुळे आर्थिक व्यवहार किंवा कांही महत्वाच्या प्रशासकीय कामांसाठीदेखील कोणीही बाहेर पडायचे कारण नव्हते. त्यामुळे शहरात नेहमी गजबजलेल्या ठिकाणी शिवाजी चौक मेन रोड,थोडगा रोड,आझाद चौक, भाजी मार्केट आदीसह सर्वत्र शुकशुकाट पहायला मिळाला.येथील शिवाजी चौक याठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवला होता.त्यामुळे विनाकारण रस्त्यावर फिरणार्यांनीही घरीच राहणे पसंत केले. रस्त्यावर कोणीच नसल्यामुळे आणि नेहमी गजबलेले रस्ते, चौक निर्मनुष्य होते. दोन दिवसावर गुढीपाडव्याचा मोठा सण आहे तरी देखील लॉकडाऊनला व्यापार्यांसह सर्व स्तरातून चांगला प्रतिसाद मिळाला.