लोहारा येथील डाळ मिल मधून साडेसहा लाखाची डाळ लंपास
उदगीर (एल. पी. उगीले) : उदगीर तालुक्यातील लोहारा येथील विनायका दाल मिल मधून संगणमत करून सहा महिन्याच्या कालावधीमध्ये जवळपास 16 लाख 39 हजार रुपयांची तूर डाळ मालकाच्या परस्पर व्यवस्थापक आणि इतर दोघांनी लंपास केली. असा दाल मिल मालकाचा आरोप आहे. दाल मिल मालकाच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी उदगीर ग्रामीण पोलिसात यासंदर्भात रीतसर तक्रार नोंदवली आहे. या संदर्भात उदगीर ग्रामीण पोलिसांकडून हाती आलेली माहिती अशी की, लोहारा परिसरातील सर्वे नंबर 492 मध्ये ज्ञानेश्वर किशोर पंदीलवार यांच्या मालकीची विनायका ॲग्रो इंडस्ट्रीज नावाची दाल मिल आहे. या दाल मिल मध्ये शशिकांत रमेश बिरादार हा सांगणाळ ता. औराद जि. बिदर येथील रहिवासी असलेला व्यक्ती मॅनेजर म्हणून काम करत होता. दरम्यान त्याने आपल्या अन्य दोन साथीदारांच्या मदतीने 15 ऑक्टोबर 2022 ते 6 मार्च 2023 या कालावधीच्या दरम्यान या विनायका दाल मिल मधून 50 किलो वजनाचे एकूण 298 तूर डाळीचे कट्टे लंपास केले, ज्याची अंदाजे किंमत 16 लाख 39 हजार रुपये होते. यासंदर्भात मिल मालक पंदीलवार यांना आपल्या दाल मिल मधून काही कट्टे कमी झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर, त्यांनी वरील तिघा विरुद्ध रीतसर फिर्याद दिली आहे. त्या फिर्यादीच्या आधारे उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशन येथे तक्रार नोंदवण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल भोळ हे करत आहेत, अद्याप चोरटे फरार आहेत. या प्रकरणाचा लवकरात लवकर तपास लावावा अशी मागणी व्यापारी वर्गातून होत आहे.