2 दिवसात लातूर पोलिसांची अवैध दारु, जुगारावर छापेमारी, 8,45,435/- रुपयाचा मुद्देमाल जप्त
लातूर (एल.पी.उगीले) : लातूर जिल्ह्यात रंगपंचमी निमित्ताने कायदा,सुव्यवस्था आणि शांतता राखली जावी,याची विशेष दक्षता घेत अवैध धंद्याच्या विरोधात कडक पावले उचलत सलग दोन दिवस धाड सत्र चालू ठेऊन पन्नास गुन्हे नोंदविण्यात आले,तसेच त्यांच्या कडून जवळपास साडे आठ लाख रुपयेचा ऐवज जप्त केला आहे.
या बाबत थोडक्यात हकीकत अशी की, रंगपंचमीच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी जिल्ह्यातील अवैध दारूविक्री व जुगारावर छापेमारी करून गुन्हे दाखल करण्यासंदर्भात जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करून सूचना दिल्या होत्या.त्याअनुषंगाने लातूर जिल्हा अंतर्गत येणाऱ्या पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अवैध धंद्यावर कार्यवाही करण्याकरिता अपर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे, सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे मार्गदर्शनात पोलीस ठाणे स्तरावर पोलीस अधिकारी,अंमलदारांची पथके तयार करण्यात आली होती. सदर पथकांद्वारे अवैध धंद्यावर कारवाई करण्याची विशेष मोहीम राबविण्यात आली होती.
दिनांक 11/03/2023 ते दिनांक 12/ 03/2023 रोजी जिल्ह्यातील विविध पोलीस ठाणे हद्दीतील देशी-विदेशी दारूची अवैध विक्री व्यवसाय, हातभट्टीची निर्मिती करणाऱ्या अवैध धंद्या संदर्भात पथकांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारावर लातूर पोलिसांनी जिल्ह्यात ठीक-ठिकाणी छापेमारी करून देशीदारूची अवैध व विनापास, परवाना चोरटी विक्री व्यवसाय, हातभट्टीची निर्मिती करीत असताना, देशी विदेशी दारूचा अवैध विक्रीसाठी साठा करून ठेवलेल्या 48 व्यक्तींचे विरोधात दारूबंदी कायद्याअंतर्गत 47 गुन्हे दाखल करून त्यांच्याकडून ₹ 3,04,595/- चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. जुगार कायद्याअंतर्गत 10 व्यक्ती विरोधात 03 गुन्हे दाखल दाखल करून त्यांच्याकडून रोख रक्कम व जुगार चे साहित्य असा एकूण ₹ 5,40,840/- रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांच्या आदेशावरून रंगपंचमीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात अवैध व्यवसाय करणाऱ्यावर मोठ्या प्रमाणावर अवैध धंद्यावर धाडी मारुन कार्यवाही करण्याचे सत्र सुरू आहे. याचाच एक भाग म्हणून दिनांक 11/03/2023 व 12/03/2023 रोजी दोन दिवस चाललेल्या कारवाईत दारूबंदी व जुगार कायद्याअंतर्गत एकूण 58 इसमा विरोधात 50 गुन्हे दाखल करून 1364 देशी-विदेशी मद्याच्या बाटल्या तसेच 268 लिटर हातभट्टी, जुगाराचे साहित्य असा एकूण ₹ 8,45,435/- चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अवघ्या दोन दिवसात लातूर पोलिसांनी अवैध धंद्याविरुद्ध कार्यवाही करत मोठ्या प्रमाणात मुद्देमाल जप्त करून अवैध धंदे करणाऱ्या वर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
याच कालावधीत मोटार वाहन कायद्याचे सर्रासपणे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकावर रहदारीस अडथळा करणे, इतरांच्या जीवितास धोका होईल अशा पद्धतीने वाहन चालवणे, दारू पिऊन वाहन चालवणे या कलमाखाली मोटार वाहन कायदा अंतर्गत 19 वाहन चालकांवर विविध पोलीस ठाणेला गुन्हे दाखल करण्यात आले आहे. तसेच सार्वजनिक शांतता भंग केल्यावरून अनेक इसमावर मपोका 110, 117 प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे. सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ.अजय देवरे, यांचे मार्गदर्शनात व सर्व उपविभागीय पोलिस अधिकारी यांचे नेतृत्वात पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व पोलिस अमलदारांनी केली आहे.