गुणवत्तेसह ‘संस्कार’ देणारे महात्मा फुले महाविद्यालय – सूर्यकांत बोईनवाड

गुणवत्तेसह 'संस्कार' देणारे महात्मा फुले महाविद्यालय - सूर्यकांत बोईनवाड

अहमदपूर (गोविंद काळे) : स्वप्नात रमता स्वप्न साकार करण्यासाठी जागे व्हा ! हा संदेश देऊन विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणाबरोबर संस्काराभिमुख शिक्षणही देणारं महाविद्यालय म्हणून महात्मा फुले महाविद्यालयाचा लौकिक आहे, असे प्रतिपादन रुई दक्षिण येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक सूर्यकांत बोईनवाड यांनी केले.

याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, ते महात्मा फुले महाविद्यालय अहमदपूर येथे आयोजित करण्यात आलेल्या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या समारोप व बक्षीस वितरण कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी विचारमंचावर मराठी साहित्याचे समीक्षक तथा ललित लेखक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील हे होते तर, उपप्राचार्य डॉ.दुर्गादास चौधरी यांची प्रमुख उपस्थित होती तसेच स्नेहसंमेलनाचे प्रभारी प्राध्यापक संयोजक डॉ.सतीश ससाणे हे उपस्थित होते.

यावेळी पुढे बोलताना सूर्यकांत बोईनवाड म्हणाले की, मुलांनो मस्तीत जगाल तर, सर्व अस्तित्व संपेल. आज आपण पाहतो आजचा काळ हा मुलींचा आहे हे मुलींनी सिद्ध करून दाखविलेलं आहे. आज प्रत्येक क्षेत्रामध्ये स्त्री आघाडीवर दिसते आणि आपल्या कॉलेजची शेख जुफिशा २०२३ ची आयडॉल देखील ठरली आहे. त्यामुळे मुलानों मस्तीत न जगता आई- वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पेटून उठले पाहिजे, असेही ते म्हणाले.

या कार्यक्रमा प्रसंगी महाविद्यालयाच्या विकासाचा अहवाल प्राचार्य डॉ.वसंत बिरादार पाटील यांनी सादर करताना ते म्हणाले की,आमचे महात्मा फुले महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी विद्यापीठ स्तरावर गुणवत्तेत निरंतर प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक मिळवून तसेच, विविध विषयांमध्ये स्वर्णपदक मिळवून गुणवत्तेचा वेलू गगना वरती नेहला आहे. गुणवत्ते बरोबरच क्रीडा, संशोधन, सांस्कृतिक, सामाजिक, साहित्यिक क्षेत्रामध्ये स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठा अंतर्गत नावलौकिक मिळविलेले एकमेव महाविद्यालय आहे, असेही ते म्हणाले. यावेळी वाड्.मयीन तसेच क्रीडा, सांस्कृतिक स्पर्धांमध्ये गुणवंत ठरलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. दुर्गादास चौधरी यांनी व्यंग्यात्मक काव्य शैलीतून विद्यार्थ्यांना संस्कारांचे डोस देतांना म्हणाले की-
‘आय कार्ड घाल, गणवेश घाल
सांगून सांगून लई झालं
शिस्त अनुशासनाची,
त्यांनी चांगभलं केलं ‘
तसेच ते पुढे म्हणाले की,
‘महाविद्यालयातील काही
विद्यार्थी येतात मैदान
गाजवण्यासाठी
तर, काही येतात व्हरांडा
सजवण्यासाठी
काही ग्रंथालयात वेळ
घालवण्यासाठी
तर, काही येतात यशाची सूत्रे
घेण्यासाठी आणि आपली
वहीवाट निश्चितकरण्यासाठी’
या पद्धतीने त्यांनी विद्यार्थ्यांना आपले भविष्य घडविण्यासाठी जागृत केले. या स्नेहसंमेलनामध्ये विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमात कलाविष्कार सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली. तसेच संगीत व साधे शेला पागोट्याच्या कार्यक्रमाने स्नेहसंमेलनात रंग भरला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्नेहसंमेलनाचे प्रभारी प्राध्यापक डॉ. सतीश ससाणे यांनी केले तर, पाहुण्यांचा परिचय डॉ. पांडुरंग चिलगर यांनी करून दिला व सूत्रसंचालन डॉ.मारोती कसाब व प्रोफेसर डॉ. अनिल मुंढे यांनी केले तर सर्व कार्यक्रमाचे आभार संयोजक डॉ. सतीश ससाणे यांनी मानले. यावेळी शैक्षणिक सहलीच्या माध्यमातून महाविद्यालयास भेट देण्यासाठी आलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रूई दक्षिणचे मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी -विद्यार्थिनी, तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक, कार्यालयीन कर्मचारी व विद्यार्थी -विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author