दारू- मटन साठी लाच घेतली, अडीच हजार !! लाचलुचपत च्या कारवाई पुढे प्राचार्य बेजार!!!
लातूर जिल्ह्यातील खळबळ जनक घटना
लातूर (एल.पी.उगीले) : दारू ही जीवनाची दशा आणि दिशा बिघडवणारी नशा असते, असे शिकवणाऱ्या शिक्षण क्षेत्रातील क्लास वन अधिकारी असलेल्या जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था मुरुड येथील प्राचार्य म्हणून कार्यरत असलेले राजेंद्र नेपाळबुवा गिरी यांनी आपल्या उतार वयात दारू आणि मटन पार्टीसाठी तक्रारदाराकडे अडीच हजाराची लाच मागितली. आणि ती पंचायत समक्ष स्वीकारली. त्यामुळे त्यांना अटक करून शिवाजीनगर पोलिसात देण्यात आले आहे. दारूच्या व्यसनाबद्दल इतरांना प्रबोधन करणाऱ्या आणि आदर्श शिक्षक घडवणाऱ्या संस्थेच्या प्राचार्यांनी दारू आणि मटनच्या पार्टीसाठी सेवानिवृत्त होऊ घातलेल्या एका कर्मचाऱ्याकडून अडीच हजाराची लाच मागितली, आणि त्या बदल्यात त्याची पेन्शन ची फाईल नागपूर कार्यालयाकडे पडताळणी करिता पासवर्ड देऊन लवकरात लवकर पाठविण्यातचे कबूल केले. तसेच चार महिन्याचा पगार काढण्यासाठी खुशाली म्हणून अडीच हजार रुपये दे, आम्ही त्या पैशातून पार्टी करू. असे पंचा समक्ष सांगून लाचीची मागणी केली. आणि थोड्याच वेळात तक्रारदार पैसे घेऊन आल्यानंतर लोकसेवक प्राचार्य राजेंद्र नेपाळबुवा गिरी यांनी आपल्या कार्यालयात पंचा समक्ष ती लाचेची रक्कम स्वीकारली. हे पाहताच प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्यांना रंगेहात पकडले. या प्रकरणी लातूर येथील शिवाजीनगर पोलीस स्टेशन येथे रीतसर कारवाई करण्यात आली आहे. हा सापळा लातूर प्रतिबंधक विभाग नांदेड परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक डॉ. राजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभाग लातूर चे पोलीस उपाधीक्षक पंडित रेजितवाड यांच्या सल्ल्यानुसार सापळा अधिकारी भास्कर पुल्ली व अन्वर मुजावर आणि त्यांच्या सहकारी पथकाने कारवाई केली असून, पुढील तपास लाचप्रतिबंधक विभाग लातूरचे पोलीस उपाधीक्षक पंडित रेजितवाड हे करत आहेत. कोणत्याही शासकीय, निमशासकीय कार्यालयात शासनाने ठरवून दिलेल्या शुल्काव्यतिरिक्त कोणताही शासकीय अधिकारी किंवा त्यांच्या वतीने दलाल व्यक्ती खुशाली किंवा आगाऊ रकमेची मागणी करत असेल तर, त्या संदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करावी. असे आवाहन पोलीस उपाधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग लातूर यांनी केले आहे.