पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीत मनसेचा राष्ट्रवादीला पाठिंबा
मनसे राष्ट्रवादीच्या भगीरथ भालकेंचा प्रचार करणार
पंढरपूर : पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप यांनी प्रतिष्ठेच्या केलेल्या पोटनिवडणुकीत आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने राष्ट्रवादीच्या भगीरथ भालके यांना पाठिंबा देऊ केला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य सचिव दिलीप धोत्रे यांनी ही माहिती दिलीदिली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने राष्ट्रवादी काँग्रेसला फक्त पाठिंबाच जाहीर केलेला नाही. तर मनसेचे नेते मतदारसंघात फिरून भगीरथ भालके यांचा प्रचारही करणार आहेत. त्यामुळे आता या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे पारडे आणखी जड झाले आहे.
राष्ट्रवादीचे माजी आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर ही जागा रिक्त झाली होती. त्यानंतर होणारी पोटनिवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांनी प्रतिष्ठेची केली आहे. या निवडणुकीसाठी सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते पंढरपूरमध्ये जोरदार प्रचार करत असून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही पंढरपूरात सभांचा धडाका लावला आहे.