लातूर जिल्हा न्यायालयात साकारले लोक अभिरक्षक कार्यालय
लातूर (एल.पी.उगीले) : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणच्या सुधारित सेवा बचाव पक्ष प्रणालीनुसार लातूर जिल्हा व सत्र न्यायालयाच्या इमारतीत लोक अभिरक्षक कार्यालय साकारण्यात आले आहे. या कार्यालयाचे उद्घाटन सर्वोच्च न्यायालयाचे न्यामूर्ती अभय ओक यांच्या हस्ते आभासी पद्धतीने करण्यात आले.लोक अभिरक्षक कार्यालयात मुख्य विधी सेवा बचाव पक्ष म्हणून अॅड. अमित जगदीश तिवारी, उप विधी सेवाबचाव पक्ष म्हणून अॅड. गुरुसिद्ध जगदीशअप्पा मिटकरी, तर सहायक विधी सेवा बचाव पक्ष म्हणून अॅड. अन्वर अकबरसाब सय्यद, अॅड. फय्याज पाशामियाँ सय्यद व विशाल पद्माकर कवडे यांची नेमणूक करण्यात अली आहे.
जिल्हा विधी प्राधिकरणकडे फौजदारी प्रकरणांमध्ये मोफत विधी सहाय्य मिळण्यासाठी आरोपींनी केलेल्या अर्जानुसार लोक अभिरक्षक कार्यालयातील वकिलांची नेमणूक केली जाईल. या वकिलांमार्फत बचाव पक्षाची बाजू न्यायालयासमोर मांडली जाईल. या कार्यालायामार्फत मोफत विधीसेवा ही अटक होण्यापूर्वीपासून ते निकाल झाल्यानंतर वरिष्ठ न्यायालयात अपील दाखल करेपर्यंत दिली जाईल, असे विधी सेवा प्राधिकरणच्या सचिव स्वाती अवसेकर यांनी कळविले आहे.
