जिद्द आणि चिकाटीचे दुसरे नाव प्राचार्य डॉ. सुधीर जगताप – रामभाऊ तिरुके
उदगीर (एल. पी. उगीले) प्राचार्य डॉ. सुधीर जगताप यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थिती मध्ये एकविसाव्या शतकाच्या पूर्वसंध्येला संगणक प्रशिक्षणाची सुविधा व्हावी, असा विचार करून उदगीर मध्ये स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या माध्यमातून संगणक ज्ञान देणारे स्वतःचे इन्स्टिट्यूट सुरू केले. उदगीर पंचक्रोशीसह सीमावर्ती भागातील विद्यार्थ्यांना संगणकाचे धडे द्यायला सुरुवात केली, जग त्यावेळेस संगणक शास्त्राच्या गतीने चालले होते. इंटरनेटच्या युगात आपल्याही भागातील विद्यार्थी वावरला पाहिजे. अशी जिद्द ठेवून एक तरुण डॉ. सुधीर जगताप यांनी मोठया जिद्दीने आणि चिकाटीने स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेची सुरुवात करून संगणक इन्स्टिट्यूट सोबतच इतरही व्यावसायिक शिक्षणाला प्राधान्य देणाऱ्या शाखा सुरू केल्या. जगाचा रोख ज्या दिशेला आहे, त्या दिशेने शिक्षण द्यावे. असे ठरवून त्यांनी प्रयत्न सुरू केले होते. मात्र सुरुवातीचा काळ अत्यंत संघर्षाचा गेला, तरीही प्राचार्य डॉ. सुधीर जगताप यांनी मोठ्या चिकाटीने ज्ञानदानाचे कार्य सुरूच ठेवले. आणि अल्पावधीतच त्यांच्या मेहनतीने लातूर जिल्हाच नव्हे तर मराठवाडा आणि सीमावर्ती भागातील विद्यार्थ्यांना अद्यावत तंत्रशिक्षणाची दारे खुली झाली. मोठ्या संघर्षातून सुधीर जगताप यांनी हे आव्हान पेल. त्यांचा आदर्श युवा पिढीने घ्यावा. असे आवाहन भाजपचे जेष्ठ नेते तथा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रामभाऊ तिरुके यांनी केले.
ते प्राचार्य डॉ. सुधीर जगताप यांची निवड स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या विज्ञान तंत्रज्ञान विद्याशाखे अंतर्गत संगणक शास्त्र या विषयाच्या अभ्यास मंडळाच्या अध्यक्षपदी बिनविरोध झाल्याबद्दल त्यांच्या सत्कार समारंभात बोलत होते. पुढे बोलताना रामभाऊ तिरुके यांनी सांगितले की, स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचा आज वटवृक्ष झालेला आहे. अनेक विद्याशाखा या शिक्षण संस्थेने सुरू केल्या असून अनेक व्यावसायिक शिक्षणही उपलब्ध करून दिले आहेत. त्यामुळे आपल्या परिसरातील तरुणांना व्यवसाय सहज उपलब्ध होऊ शकतील, असेही सांगितले.
याप्रसंगी सत्काराला उत्तर देताना प्राचार्य डॉ. सुधीर जगताप यांनी सांगितले की, उदगीर आणि परिसरातील जनतेने आपल्यावर भरपूर प्रेम केले. जनतेने केलेल्या सहकार्यामुळेच उदगीरच्या शैक्षणिक प्रगतीमध्ये आमच्या संस्थेलाही सहभागी होता आले, याचा मला मनस्वी आनंद आहे. आणि उदगीर परिसरातील जनतेचा मी सदैव ऋणी आहे, असे सांगितले.
