गारपीट, अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करावेत – पालकमंत्री गिरीश महाजन

गारपीट, अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करावेत - पालकमंत्री गिरीश महाजन

लातूर (एल.पी.उगीले) : जिल्ह्यात 17 व 18 मार्च रोजी अवकाळी पाऊस, गारपिटीने शेतपिकांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे तातडीने करून त्याबाबतचा अहवाल सादर करण्याचे आदेश पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दिले आहेत. लातूर जिल्ह्यात गारपीट, अवकाळी पावसामुळे नुकसान झाल्याची माहिती मिळताच पालकमंत्री महाजन यांनी तातडीने लातूर येथे येवून नुकसानीचा आढावा घेतला. तसेच प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जावून नुकसानीची पाहणी केली. त्यावेळी त्यांनी शेतकऱ्यांकडून नुकसानीची माहिती घेतली. तसेच या अस्मानी संकटाच्या काळात राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी असून तातडीने मदत देण्याची कार्यवाही केली जाणार असल्याचे सांगून त्यांनी शेतकऱ्यांना धीर दिला.

पालकमंत्री महाजन यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीला खासदार सुधाकर शृंगारे, आ. रमेश कराड, आ. अभिमन्यू पवार, जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी., जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, महानगरपालिका आयुक्त बाबासाहेब मनोहरे, निवासी उपजिल्हाधिकारी विजयकुमार ढगे, उपजिल्हाधिकारी जीवन देसाई, जिल्हा नियोजन अधिकारी एम. एस. दुसिंग, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी दत्तात्रय गावसाने, विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. समीर जोशी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. लक्ष्मण देशमुख, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एच व्ही. वडगावे यावेळी उपस्थित होते.अवकाळी पाऊस, गारपिटीने जिल्ह्यात ज्वारी, हरभरा सारख्या पिकांसह आंबा, द्राक्षेसारख्या फळबागांचेही नुकसान झाले आहे. गारपीट आणि अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतपीक नुकसानीचे पंचनामे तत्काळ सुरु करण्याचे आदेश सर्व संबंधित अधिकाऱ्यांना द्यावेत. पंचनामे करताना एकही नुकसानग्रस्त शेतकरी वंचित राहणार नाही, याची दक्षता घ्यावी, अशा सूचना पालकमंत्री महाजन यांनी आढावा बैठकीत दिल्या.

जिल्ह्यात 17 मार्च रोजी झालेल्या अवकाळी पावसाने देवणी तालुक्यात सुमारे एक हजार 67 हेक्टर, अहमदपूर तालुक्यात सुमारे आठ हेक्टर आणि जळकोट तालुक्यात सव्वाचार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. तसेच 18 मार्च रोजी झालेल्या गारपीट, अवकाळी पावसाने जिल्ह्यातील इतरही तालुक्यांमधील शेतपिकांचे नुकसान झाले असून या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आल्याचे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी सांगितले. कर्मचाऱ्यांचा संप सुरु असला तरी शेतपिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी कर्मचारी सहकार्य करणार आहेत. जिल्ह्यात शुक्रवारी वीज कोसळून एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याचेही त्यांनी सांगितले.

About The Author

error: Content is protected !!