अल्पवयीन पाल्यांनी मोटारसायकल चालवल्यास पालकांना जेल, मोटार वाहन कायद्यात मोठा बदल
लातूर (एल.पी.उगीले) : अल्पवयीन मुलांकडून सार्वजनिक रस्त्यावर वाहने चालवल्याने अपघातांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. याला प्रतिबंध घालण्यासाठी अल्पवयीन मुलाकडून सार्वजनिक रस्त्यावर वाहने चालवल्यास त्यावर कठोर कारवाई म्हणून पालकांना जेलची शिक्षा तसेच मोठा दंड अशी शिक्षा मोटार वाहन कायद्यात करण्यात आली आहे. या संदर्भात उपप्रादेशिक परिवहन अधिकारी सांगली यांनी प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठी परिपत्रक काढले आहे. सदरील परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे की, 18 वर्षाखालील मुलांना वाहन चालवण्याचा परवाना नसल्यामुळे वाहने चालवण्याची परवानगी देऊ नये. अशा प्रकारचे प्रबोधन केले जात आहे. गेली दोन महिने उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सांगली यांच्या वतीने जनजागृतीही करण्यात आली, त्यासाठी वेगवेगळ्या शाळा आणि महाविद्यालयात जाऊन कार्यक्रम घेऊन विद्यार्थ्यांना समज देण्यात आली. तसेच जिल्हाधिकारी सांगली यांनी या अनुषंगाने बैठक घेऊन अल्पवयीन वाहन चालकावर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्याला अनुसरून उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने वायुवेग पथकाने धडक मोहीम सुरू केली आहे.
पहिल्याच दिवशी वीस अल्पवयीन वाहन चालकावर दंडात्मक कारवाई करून बारा वाहने जप्त केले आहेत. सदरील मोहीम सांगली शहर व सांगली जिल्हा येथे राबवण्यात आली असून नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे, तसेच आपल्या अठरा वर्षाखालील मुलांना वाहन चालवण्यास परवानगी देऊ नये. सोळा वर्षाखालील मुलांनी वाहन चालवण्याचा गुन्हा केला तर सदर गुन्ह्यामध्ये दोषी आढळल्यास मुलांच्या पालकांना तीन वर्ष कारावास व पंचवीस हजार रुपये दंडाची तरतूद मोटार वाहन कायद्यामध्ये करण्यात आली आहे. तसेच वाहन चालवण्याचा परवाना नसताना वाहन चालवल्या बद्दल पालकास पाच हजार रुपये व वाहन मालकास पाच हजार रुपये असा एकूण दहा हजार रुपये दंड अशा शिक्षेची तरतूद मोटार वाहन कायद्यात करण्यात आली आहे. त्यामुळे अल्पवयीन पाल्यांना पालकांनी वाहने देऊ नये. असे आवाहनही प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. सध्या गतिमान युग झाले आहे. शालेय विद्यार्थीच शिकवणी आणि शाळा, महाविद्यालयात जाण्यासाठी वाहन चालवण्याचा परवाना नसतानाही बिनधास्तपणे दुचाकी चालवत आहेत. काही वेळेस अनावधानाने गती वाढल्यामुळे अपघात होत आहेत, तर काही वेळेस महाविद्यालयीन विद्यार्थी घाई गर्दीत रस्त्यावरून सिनेमा स्टाईलने जाण्यासाठी गती वाढवत आहेत, अशा प्रकारामुळे अपघात वाढले आहेत. या अपघातांना प्रतिबंध घालण्यासाठी तसेच अल्पवयीन मुलांना वाहन चालवण्यापासून परावर्तन करण्यासाठी मोटार वाहन कायद्यात कठोर कारवाईची तरतूद करण्यात आली आहे. सांगली जिल्ह्यात याची अंमलबजावणी सुरू झाली असून इतरही जिल्ह्यात लवकरच त्याची अंमलबजावणी होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे.
