मॉडीफाय सायलेन्सर वापरणाऱ्या विरुद्ध वाहतूक नियंत्रण शाखेची विशेष मोहीम “माहिती द्या आणि डिस्काउंट कुपन मिळवा”
लातूर (एल.पी.उगीले) : लातूर शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी शहर वाहतूक नियंत्रण शाखेकडून विविध उपक्रम राबवले जात आहेत. त्यामध्ये विविध सेवाभावी संस्था कडून गर्दीच्या ठिकाणी वाहतूक नियमाचे पालन करणे बाबत जनजागृती, पथनाट्याचे आयोजन करणे, वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यामुळे होणाऱ्या परिणामाचे विविध प्रकारचे व्हिडिओ व इमेज तयार करून ते मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर प्रसारित करणे, तसेच वेळोवेळी विशेष मोहीम राबवून बेशिस्त वाहन चालका विरोधात कठोर कारवाई करणे. अशा प्रकारच्या कारवाया करून व वारंवार सूचना देऊनही काही वाहन चालक वाहतूक नियमांचे सर्रास उल्लंघन करीत आहेत. अशा वाहन चालकांना शिस्त लावण्यासाठी लातूर शहरातील नागरिकांची मदत घेतली जाणार आहे.
पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांचे संकल्पनेतून लातूर शहरातील वाहतुकीस शिस्त लावण्यासाठी व वाहतूक नियमन सुरळीत होण्यासाठी विविध प्रकारे उपाय योजना करण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून वाहनामध्ये नियमबाह्य बदल करून मोठ्या आवाजाचे मॉडीफाय सायलेन्सर बसविणाऱ्या वाहनांचे फोटो काढून ते वाहतूक नियंत्रण शाखेने दिलेल्या व्हाट्सअप क्रमांकावर पाठवावे. वाहतूक नियंत्रण शाखेकडून संबंधित फोटोचे विश्लेषण करण्यात येईल. विश्लेषणाअंती संबंधित वाहन चालकाने मॉडीफाय सायलेन्सरचा वापर केल्याचे निष्पन्न झाल्यास संबंधित वाहन चालकावर कारवाई करण्यात येणार आहे. तसेच सामाजिक बांधिलकी जपत वाहतूक नियमनास हातभार लावले म्हणून मॉडीफाय सायलेन्सर वापरणाऱ्या मोटरसायकल,वाहनाचे फोटो काढून वाहतूक नियंत्रण शाखेला पाठविलेल्या नागरिकास लातूर शहरातील 11 आस्थापना मधून त्यांनी खरेदी केलेल्या वस्तू व सेवावर सवलत देण्यात येणार असून तसे सवलतीचे कुपन वाहतूक नियंत्रण शाखेकडून संबंधितांना देण्यात येणार आहे.
सदरची आस्थापना पुढील प्रमाणे- सुखसागर फूड्स, गांधी चौक लातूर., हॉटेल भोज-अल्पोहार, हनुमान चौक, लातूर.,गायत्री व्हेज, सुभाष चौक, लातूर., मार्तंड मिसळ, हत्ते कॉर्नर,लातूर., KFC केएफसी, अंबाजोगाई रोड,लातूर.,वन अँड ओन्ली हॉटेल, बस डेपो समोर, लातूर.,डोमिनोज, राजीव गांधी चौक, लातूर.,हल्दीराम, राजीव गांधी चौक, लातूर., गोदावरी बेकर्स, खर्डेकर स्टॉप, लातूर.,रेमंड शोरूम, क्रीडा संकुल समोर, लातूर., द्वारकादास श्यामकुमार, एसपी ऑफिस शेजारी, लातूर.असे असून वाहतूक नियंत्रण शाखेने दिलेल्या कुपनवर ग्राहकाने खरेदी केलेल्या वस्तूवर सवलत देण्यात येणार आहे.
लातूरकरांनी मोठ्या आवाजाचे मॉडीफाय कर्ण-कर्कश सायलेन्सर वापरणाऱ्या मोटर सायकलचे स्पष्ट व क्रमांकासह असलेले फोटो वाहतूक नियंत्रण शाखा येथील मोबाईल क्रमांक 8149816049 वर पाठवावे.असे आवाहन करण्यात येत आहे, माहिती देणारे व कुपन प्राप्त करणारे व्यक्तिचा मोबाईल नंबर व नाव पत्ता गुप्त ठेवण्यात येणार आहे.
