हिंदवी स्वराज्याचा पाया शहाजीराजे भोसले यांनी घातला – डॉ. दिगंबर माने

हिंदवी स्वराज्याचा पाया शहाजीराजे भोसले यांनी घातला - डॉ. दिगंबर माने

अहमदपूर (गोविंद काळे) : जगात सर्वप्रथम जनतेचे राज्य छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केले. यालाच पुढे हिंदवी स्वराज्य हे नाव मिळाले. इतिहासात अद्वितीय ठरलेल्या या हिंदवी स्वराज्याचा पाया छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचे वडील शहाजीराजे भोसले यांनी घातला, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध कवी, लेखक भूगोल विभाग प्रमुख डॉ. दिगंबर माने यांनी केले.

या बाबतचे सविस्तर वृत्त असे की, येथील महात्मा फुले महाविद्यालयात प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली इतिहास विभागाच्या वतीने झालेल्या शहाजीराजे भोसले जयंती कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. दुर्गादास चौधरी हे होते. यावेळी पुढे बोलताना डॉ. माने म्हणाले की, इतिहासकारांनी शहाजीराजे भोसले यांच्यावर अन्यायच केलेला आहे. शहाजीराजे भोसले यांना मराठी बरोबरच हिंदी, उर्दू , कन्नड आणि तेलुगु आदी भाषा अवगत होत्या. त्यांनी शत्रुंविरुद्ध अनेक लढाया लढून स्वतःचे नेतृत्व सिद्ध केले होते. मात्र त्यांना स्वतःचे राज्य निर्माण करता आले नाही, हे जरी खरे असले तरी त्यांनी बाल शिवबांच्या मनात स्वराज्याविषयी प्रेरणा निर्माण केली. एवढेच नव्हे तर छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापनेसाठी मदत करुन खऱ्या अर्थाने स्वराज्याचा पाया घातला. जेव्हा स्वराज्य धोक्यात आले तेव्हा तेव्हा शहाजीराजांनी परकीय शत्रूंपासून स्वराज्याचे संरक्षण केले, असेही ते यावेळी पुढे बोलताना म्हणाले. अध्यक्षीय समारोपात उपप्राचार्य डॉ.दुर्गादास चौधरी यांनी शहाजीराजे भोसले यांच्या जीवन कार्याचा गौरव केला.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संयोजक डॉ.बी.के. मोरे यांनी केले तर, आभार प्रदर्शन संतोष पाटील यांनी केले यावेळी डॉ. सतीश ससाणे, प्रो.डॉ. अनिल मुंढे, डॉ. पांडुरंग चिलगर, प्रो.डॉ.अभिजीत मोरे, डॉ. मारोती कसाब, डॉ. प्रशांत बिरादार, डॉ. प्रकाश चौकटे, डॉ. सचिन गर्जे, प्रा. अतिश आकडे, प्रा. प्रकाश गायकवाड, प्रा. दत्ता चव्हाण, प्रशांत डोंगळीकर, अजय मुरमुरे, चंद्रकांत शिंपी यांच्यासह महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!