हत्तीबेट व रामघाट स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास जिवंत करण्याचा अनोखा प्रयोग: बखर हौतात्म्यांची
श्यामलाल संस्थेचा पुढाकार:४०० जणांचे महानाट्य
उदगीर(एल.पी.उगीले) : ७५ वर्षांपूर्वी मराठवाडा मुक्ती संग्रामात किसान दल व निजामाच्या सैन्यात झालेल्या लढाईचा जिवंत इतिहास आजच्या पिढीला पाहता यावा, यासाठी उदगीर येथील श्यामलाल शिक्षण संस्थेने पुढाकार घेतला आहे. मराठवाडा मुक्ती संग्रामासाठी या भागात झालेल्या स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासाची पाने जिवंत करण्याचा अनोखा शैक्षणिक महानाट्याचा प्रयोग सादर करण्यासाठी ४००विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आहे. मराठवाडा मुक्ती संग्रामात हत्तीबेट व रामघाट डोंगर या दोन ठिकाणी लढाई झाली असल्यामुळे,ही दोन्ही ठिकाणे या महानाट्यातून पहायला मिळणार आहेत.
मराठवाडा मुक्ती संग्रामाचे हे अमृत महोत्सवी वर्षे आहे. केंद्र व राज्य शासनाने हे वर्ष अमृतमहोत्सवी वर्ष म्हणून साजरे करण्याचा निर्णय घेतला आहे. देश स्वातंत्र्याच्या नंतर निजामाच्या जोखडातून मुक्त होण्यासाठी मराठवाड्याला तब्बल एक वर्ष वाट पहावी लागली.भारतीय जनता स्वातंत्र्याचा आनंद घेत असताना मराठवाड्यातील जनता मात्र निजामाच्या अत्याचाराखाली दबून होती.या अन्यायी निजामापासून मुक्ती मिळविण्यासाठी हैदराबाद राज्यात ठिकठिकाणी कॅम्प उभारून सशस्त्र लढे उभारले गेले.निजामी राजवट नष्ट व्हावी, हैदराबाद राज्यातील जनता निजामी जोखडातून मुक्त होवून लोकशाहीची स्थापना व्हावी. यासाठी १९४८ साली या भागातील तरुणांनी निजामाबरोबर लढण्याचे रणशिंग फुंकले. रजाकारांना प्रतिकार करण्यासाठी तोंडचिर चा रामघाट व देवर्जन गावाजवळील हत्तीबेट या दोनच डोंगर जंगलाचा आधार होता.या दोन्ही ठिकाणी किसान दलाचे हजारों तरुण व निजामाचे लष्कर यांच्यात या दोन्ही ठिकाणी लढाई होवून निजामाचा पराभव झाला. उदगीर तालुक्यातील ही दोन्ही ठिकाणी झालेल्या लढाईचा जिवंत इतिहास या अमृतमहोत्सवी वर्षात पहायला मिळणार आहे. श्यामलाल संस्थेचे अध्यक्ष व बखर हौतात्म्यांची या महानाट्याचे प्रमुख सुपोषपाणी आर्य , सहसंकल्पक अंजुमनी आर्य, दिग्दर्शक सुनील बागडे,लेखक भारत खंदारे, सह दिग्दर्शक उमाकांत सूर्यवंशी, महेश हुलसुरे, श्रीहरी निडवंचे, विक्रम मलकापूरे, मंच व सजावट प्रमुख बालाजी चव्हाण ,विजय बैले, ग्रंथपाल सूर्यकांत शिरसे, गोपाळ रेड्डी यांच्या पथकाची व अन्य दिग्दर्शकांची बैठक हत्तीबेटावर पार पडली. या बैठकीत हत्तीबेट, रामघाट डोंगर या सह मराठवाड्यात ठिकठिकाणी झालेल्या सत्याग्रहाचा जिवंत इतिहास नव्या पिढीसमोर आणण्याचा निर्णय घेण्यात आला. या पथकाकडून मुक्ती संग्रामात सहभाग घेतलेल्या स्वातंत्र्य सैनिक व त्यांच्या पालक व वारसांचा सत्कार केला जात आहे.हत्तीबेटावर या पथकाचे स्वागत व आभार प्रदर्शन व्ही. एस. कुलकर्णी यांनी केले.
