आता सायबर वरून लुबाडणाऱ्यांनी घेतला महावितरणचा आधार ?
लातूर (एल. पी. उगिले) : सायबर गुन्हेगारी करणाऱ्यांनी आणि सर्वसामान्य माणसाची लूट करणाऱ्यांनी वेगवेगळे मार्ग अवलंबायला सुरुवात केली आहे. कधी एटीएम कार्ड ची चोरी करून, तर कधी वयोवृद्ध नागरिकांच्या एटीएम कार्डाची अदलाबदल करून लूट करत असतानाच, आता या सायबर चोरांनी नवीन फंडा शोधला आहे. हे लोक स्वतःला इलेक्ट्रिसिटी पावर अधिकारी असल्याचे दाखवून ते विद्युत ग्राहकांना तुमचा विद्युत पुरवठा आज रात्री साडेनऊ वाजता बंद होणार आहे. असे सांगून एक मोबाईल क्रमांक संपर्क करण्यासाठी देत आहेत. त्या क्रमांकावर संपर्क केल्यास त्या वीज ग्राहकांची फसवणूक होणे अटळ आहे. सावधगिरीचा इशारा देत सावधान म्हणून हा मेसेज मोबाईल वरून दिला जात असला तरी, वास्तविक पाहता ही धोक्याची घंटी आहे. हे ओळखणे गरजेचे आहे. कित्येक वेळा बँका आणि शासकीय कार्यालय वेळोवेळी सांगत आहेत की, कोणतीही बँक किंवा शासकीय कार्यालय आपल्याला ओटीपी क्रमांक विचारत नाहीत. किंवा बँकेच्या संदर्भातील खाजगी माहितीही विचारत नाहीत. तरीदेखील दुर्दैवाने काही कमी शिकलेले किंवा अज्ञानी लोक अशा लोकांची शिकार बनतात. त्यामुळे कोणतेही अशा मेसेजला नागरिकांनी भीक घालू नये, अशा पद्धतीची सूचना काही जागरूक नागरिकांनी दिली आहे.
