स्वतःच्या उणिवांना खिलाडूपणाने स्विकारणारा खरा विजेता – गुडसूरकर
देवणी(प्रतिनिधी) : ‘स्वतःच्या व्यंगाला स्विकारून त्याला खिलाडूपणे स्विकारणे ज्याला जमते तो खरा विजेता असतो.’ असे मत महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे सदस्य धनंजय गुडसूरकर यांनी व्यक्त केले.कै.रसिका महाविद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. शिवाजी सोनटक्के होते. शिक्षण हे जीवनाला आकार देते, हे जरी खरे असले तरी त्याला आपण देणारा प्रतिसाद महत्त्वाचा असतो,हा प्रतिसाद सकारात्मक असेल तर जीवनाची वाट यशस्वी होते.असे मत गुडसूरकर यांनी पुढे बोलताना व्यक्त केले.सामाजिक प्रश्नांशी जोडला जाणारा युवावर्ग ही खरी सामाजिक संपत्ती असल्याचे सांगून भवतालाशी जोडून राहण्याचे आवाहन त्यांनी केले. गुडसूरकर यांनी कविता,वात्रटिका व विनोदी किस्से सांगून कार्यक्रमात रंगत आणली. शेलापागोट्याच्या कार्यक्रमाचा आनंद विद्यार्थ्यांनी घेतला.अध्यक्षीय समारोपात डॉ. सोनटक्के यांनी महाविद्यालयाच्या प्रगतीचा आढावा घेतला.विविध स्पर्धामधील पारितोषकांचे वितरण यावेळी करण्यात आले.मु.अ.प्रशांत घोळपे,उपसरपंच अंकुश माने,सौ.वेष्णवी बिरादार,डॉ.सुदर्शन पेडगे,प्रा.डॉ .प्रशांत भंडे,प्रा.गोपाळ सोमाणी आदी उपस्थित होते.
