महिलांना कायदेविषयक ज्ञान आवश्यक- डॉ. सतीश ससाणे
अहमदपूर (गोविंद काळे) : आजच्या काळात वाढत असलेली गुन्हेगारी, अन्याय, अत्याचार आदींना प्रतिबंध करण्यासाठी महिलांना कायदेविषयक ज्ञान असणे आवश्यक आहे, असे स्पष्ट प्रतिपादन महात्मा फुले महाविद्यालय अहमदपूर येथील समाजशास्त्र विभाग प्रमुख डॉ. सतीश ससाणे यांनी केले. याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, किनगाव येथील महात्मा फुले महाविद्यालयाच्या समाजशास्त्र विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या अतिथी व्याख्याना प्रसंगी ते बोलत होते. यावेळी विचार मंचावर समाजशास्त्र विभाग प्रमुख डॉ.बळीराम पवार उपस्थित होते. पुढे बोलताना डॉ.ससाणे म्हणाले की, सामाजिक माध्यमांचा दुरुपयोग मोठ्या प्रमाणात होत असून, यातूनच गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे. गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी सामाजिक जनसंचार माध्यमांचा उपयोग सकारात्मक दृष्ट्या केला पाहिजे, असेही ते म्हणाले. अतिथी व्याख्यानमालेचा समारोप समाजशास्त्र विभागप्रमुख डॉ.बळीराम पवार यांनी केला. यावेळी समाजशास्त्राचे विद्यार्थी – विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
