बंदुकीचा धाक दाखवून दोन लाखांची खंडणी वसूल! चौघा विरुद्ध गुन्हा दाखल, पोलिसांचा वचक संपला?
उदगीर (एल. पी.उगिले ) : उदगीर शहरा लगत असलेल्या रेड्डी कॉलनीतील एका कुटुंबास चौघाजणांनी मिळून संगणमत करून, गेल्या महिन्याभरापासून चाकू व बंदुकीच्या जोरावर सतत धाक दाखवून, धमकी देऊन दोन लाख रुपयांची खंडणी वसूल केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशन येथे फिर्यादीच्या तक्रारीवरून रीतसर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
पोलीस सूत्राकडून हाती आलेली माहिती अशी की, शैलेश पाटील (रा. लिंबगाव), वैभव देशमुख (रा. निडेबन, उदगीर), आदित्य कांबळे (रा. चर्च रोड,उदगीर), ओमकार श्रीधर खंडागळे (रा. भेडेगाव ता. मुखेड ह. मु. उदगीर) या चौघांनी संगणमत करून, फिर्यादीच्या मुलास बंदुक व चाकूचा धाक दाखवून त्याचे आई-वडील व भावास जिवे मारण्याची धमकी दिली. फिर्यादीच्या मुलाकडून वारंवार खंडणी मागून फिर्यादीच्या मुलाच्या पाठीवर, गालावर व इतर ठिकाणी लाथा बुक्क्यांनी मारहाण करून त्यास जखमी केले. तसेच फिर्यादीच्या मुलाकडून गेल्या एक महिन्यापासून ते आजपर्यंत रोख रक्कम दोन लाख एक हजार चारशे पन्नास रुपयांची खंडणी वसूल केली. याप्रकरणी तक्रारदार उमेश गोकुळदास झंवर (रा. रेड्डी कॉलनी, उदगीर) यांच्या फिर्यादीवरून वरील चारही लोकांच्या विरुद्ध उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये गु.र.क्रमांक 198 /23 कलम 384, 386, 523, 504, 506, 34 भारतीय दंड विधान संहिता अन्वये रीतसर गुन्हा नोंद करून पोलीस उपनिरीक्षक तारू यांच्याकडे पुढील तपास सोपवण्यात आला आहे.
उदगीर ग्रामीण पोलिस स्टेशन हद्दीत सध्या अवैध धंदेवाले आणि चोरटे, खंडणीवाले यांची मनमानी चालू आहे की काय? अशी शंका आता नागरिकांना येऊ लागली आहे. पोलीस प्रशासनाला खंडणी मागणाऱ्यांची स्पष्ट माहिती देऊन देखील आरोपी अद्याप अटक नाहीत, ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हाकेच्या अंतरावर अवैध दारू विक्री खुलेआम चालू असून देखील पोलीस या बाबतीमध्ये डोळेझाक का करत आहेत? असेही प्रश्न या परिसरातील नागरिकांना पडला आहे. लोणी, हाकनाकवाडी, लोणी पाटी, तोंडार पाटी या भागातही अवैध देशी दारू, हातभट्टी दारू विक्री केली जात आहे. याची माहिती पोलिसांना असून देखील पोलीस कोणतीच कारवाई करत नसल्याने सामान्य नागरिक नाईलाज म्हणून हे सर्व सहन करत आहेत.
