व्यापा-यांकडून होणा-या लुटीपासून ग्राहकांनी सावध राहावे – उपजिल्हाधिकारी प्रवीण फुलारी

व्यापा-यांकडून होणा-या लुटीपासून ग्राहकांनी सावध राहावे - उपजिल्हाधिकारी प्रवीण फुलारी

अहमदपूर ( गोविंद काळे) जागतिकीकरणाच्या काळामध्ये विविध सेवा आणि वस्तूंच्या खरेदीदारांची भांडवली बाजाराकडून विशेषतः व्यापा-यांकडून लूट होण्याची अधिक शक्यता असून, जागृत ग्राहक ही आजची गरज बनली आहे, असे प्रतिपादन उपजिल्हाधिकारी प्रवीण फुलारी यांनी केले.
महाराष्ट्र शासन, तहसील कार्यालय अहमदपूर व महात्मा फुले महाविद्यालय, अहमदपूर यांच्या संयुक्त विद्यमाने महात्मा फुले महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित केलेल्या जागतिक ग्राहक हक्क दिन कार्यक्रमात उद्घाटक म्हणून अहमदपूरचे उपविभागीय अधिकारी प्रवीण फुलारी हे बोलत होते.
यावेळी विचारपीठावर तहसीलदार प्रसाद कुलकर्णी, महाविद्यालयाचे प्राचार्य तथा ज्येष्ठ समीक्षक व लेखक डॉ. वसंत बिरादार पाटील, अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे जिल्हाध्यक्ष दत्तात्रय मिरकले पाटील, ग्राहक संघटना ग्राहक पंचायत महाराष्ट्र राज्याचे जिल्हाध्यक्ष डॉ. प्रल्हाद तिवारी, स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे अध्यक्ष विकास देशमुख, दिलीप पाटील, नायब तहसीलदार डी. के. मोरे , उपप्राचार्य डॉ. डी.डी. चौधरी, रा.ना. शिंदे, बालाजी इंगळे, दत्तात्रय निलावार, नामदेव अर्जुने आदी उपस्थित होते.
उपजिल्हाधिकारी प्रवीण फुलारी पुढे बोलताना श्री. फुलारी म्हणाले की, ग्राहक हा चोखंदळ असला पाहिजे. तसेच तो आपल्या हक्क आणि अधिकारांविषयी सजग असला पाहिजे. बाजारपेठेकडून आपली फसवणूक होणार नाही, याची संपूर्ण खबरदारी ग्राहकाने घेतली पाहिजे असेही ते यावेळी बोलताना म्हणाले. यावेळी ग्राहकांना मार्गदर्शन करताना ग्राहक पंचायतीचे जिल्हाध्यक्ष दत्तात्रय मिरकले पाटील म्हणाले की, ग्राहकांच्या हक्कांसाठी ग्राहक संरक्षण कायदा निर्माण झालेला असून, या कायद्याची माहिती समाजातल्या सर्व स्तरात पोहोचविणे ही शासन आणि स्वयंसेवी संस्थांची प्रमुख जबाबदारी आहे. शोषणमुक्त समाजासाठी हा कायदा सर्वांनी अभ्यासावा व आपली फसवणूक टाळावी असेही ते पुढे म्हणाले. यावेळी बोलताना डॉ. प्रल्हाद तिवारी म्हणाले की बाजारातील विक्रीला आलेल्या वस्तूंची संपूर्ण माहिती देणे हे दुकानदाराचे कर्तव्य असून, ग्राहकांचा तो हक्क आणि अधिकार आहे. ग्राहकांनी जोपर्यंत आपले समाधान होत नाही, तोपर्यंत वस्तू घेऊ नये. तसेच वस्तूची संपूर्ण उत्पादन किंमत, उपयुक्तता आणि सुरक्षितता आदी बाबींची माहिती घेऊनच खरेदी करावी असेही ते यावेळी म्हणाले. ‌
या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य ज्येष्ठ लेखक, समीक्षक प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील म्हणाले की, शेतकरी राजा, मतदार राजा, आणि ग्राहक राजा या तिघांना समाजात मान आहे.पण ते नावालाच राजे आहेत.त्यांचीच लूट केली जाते.हे केवळ मानाचेच धनी होता कामा नये, असे म्हणून त्यांनी ग्राहकांनी आपल्या अधिकारांविषयी सतत जागृत राहिले पाहिजे व आपली फसवणूक होणार नाही याची पुरपुर काळजी घेतली पाहिजे. ग्राहकांना मोठेपणा देऊन दुकानदार त्यांच्या माथी निकृष्ट वस्तू ठेवतात. म्हणून तसे न करता तटस्थपणे आपल्याला खरेदी करण्याची सवय लावली पाहिजे. त्याचबरोबर वस्तूंची संपूर्ण माहिती घेतली पाहिजे आणि मुख्य म्हणजे खरेदी केलेल्या वस्तूंची पक्की पावती न विसरता घेतली पाहिजे, असेही ते यावेळी म्हणाले. तसेच ऑनलाइन खरेदी- विक्रीच्या व्यवहारात अधिक सावधानता बाळगावी असेही, त्यांनी आपल्या भाषणात सांगितले.
या वेळी अमेरिकेतील सेंट्रल यूनिवर्सिटी ऑफ अमेरिकेच्या वतीने प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांना डी. लीट्. ही बहुमानाची पदवी मिळाल्याबद्दल त्यांचा प्रशासनाच्या वतीने उपजिल्हाधिकारी प्रवीण फुलारी व तहसीलदार प्रसाद कुलकर्णी यांच्या हस्ते भव्य सत्कार करण्यात आला. तसेच जागतिक ग्राहक हक्क दिनानिमित्त महाविद्यालयाच्या अर्थशास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या ‘अर्थस्पंदन’ या भितीपत्रकाचे प्रकाशनही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभागप्रमुख डॉ. बब्रुवान मोरे यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. मारोती कसाब यांनी केले. यावेळी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी यांच्यासह परिसरातील स्त्री- पुरुष ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!