मूलभूत पाया व्यवस्थित असेल,तर बँकिंग क्षेत्रात संधी – अच्युत दमकोंडवार
उदगीर (एल.पी.उगीले) : बँकिंग क्षेत्रात दरवर्षी हजारो जागा भरल्या जातात. गणित, बुद्धिमत्ता, इंग्रजी भाषा व संगणक काही प्रमाणात सामान्य ज्ञान हे विषय या क्षेत्रासाठी महत्त्वाचे आहेत. योग्य नियोजन केल्यास विद्यार्थी एक ते दीड वर्षात बँकिंगच्या परीक्षेत यश प्राप्त करू शकतात. परंतु यासाठी मूलभूत पाया देखील व्यवस्थित असणे गरजेचे आहे, असे विचार उदगीर येथील सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे वरिष्ठ शाखा प्रबंधक अच्युत दमकोंडवार यांनी मांडले.
येथील श्री हावगीस्वामी महाविद्यालयात व्यवसाय मार्गदर्शन व स्पर्धा परीक्षा समितीच्या वतीने ध्यास यशाचा या उपक्रमांतर्गत आभासी पद्धतीने आयोजित व्याख्यानमालेचे चौथे पुष्प वयाच्या चोवीसाव्या वर्षी बँकेत अधिकारी झालेले अच्युत दमकोंडवार यांनी गुंफले. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डॉ.एन.जी.एमेकर व उपप्राचार्य डॉ.अप्पाराव काळगापुरे यांची प्रमुख उपस्थिती होती. सुरुवातीला मार्गदर्शकांचा परिचय समितीचे प्रमुख डॉ.एल.के.उलगडे यांनी करून दिले.
पुढे बोलताना दमकोंडवार म्हणाले की, बँकिंगच्या परीक्षा देण्यासाठी कोणत्याही शाखेतील पदवी असणे आवश्यक आहे. विशेषत: बीकॉम व एमबीए झालेल्या विद्यार्थ्यांना तर या क्षेत्रात अनेक संधी आहेत.बँकिंग क्षेत्राची तयारी करणारे विद्यार्थी एलआयसीमध्ये सुद्धा परीक्षा देऊन जाऊ शकतात. या क्षेत्रात चालू विषयावरील प्रश्न देखील महत्त्वाचे असतात.काही प्रमाणात नोकरी करत असताना ताणतणाव असले तरी व्यवस्थित नियोजन केल्यास समाजाशी सुद्धा चांगल्या पद्धतीने जोडून घेता येते.
यावेळी त्यांनी आपल्या यशाचे रहस्य उघडून दाखवले. तसेच क्रोनिकल मासिक, बिजनेस, इकॉनॉमिक्स व टाइम्स ऑफ इंडिया न्यूज पेपर किती महत्त्वाचे आहेत, हे सांगत बँकिंग परीक्षेच्या अभ्यासक्रम व परीक्षा पद्धती या संदर्भात विस्ताराने भाष्य केले.
महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.अप्पाराव काळगापुरे शुभेच्छा देताना म्हणाले की, व्यवसाय मार्गदर्शन व स्पर्धा परीक्षा समितीच्या वतीने आयोजित या उपक्रमाच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना निश्चितच दिशा मिळेल. महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डॉ.एन.जी.एमेकर म्हणाले, बँकिंग क्षेत्रात रोजगाराच्या अनेक संधी दडलेले आहेत. या समितीच्या वतीने विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी म्हणून, विशेष करून तरुण अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन ठेवण्यात आलेले आहे. याचा विद्यार्थ्यांनी फायदा करून घेतला पाहिजे.आभासी पद्धतीने आयोजित या व्याख्यानमालीस साठ ते सत्तर विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समितीतील सर्व प्राध्यापकांनी प्रयत्न केले.सूत्रसंचालन प्रा.जे.डी.संपाळे तर आभार प्रा.एस.एस.स्वामी यांनी मानले.
