समाज माध्यमावरील “त्या” बातमीमुळे अनेकांची तारांबळ !

समाज माध्यमावरील "त्या" बातमीमुळे अनेकांची तारांबळ !

उदगीर (एल.पी.उगीले) काही काही बातम्या समाज माध्यमावर गोंधळ निर्माण करणाऱ्या टाकल्या जातात. कधी कधी त्या केवळ आणि केवळ अफवाच असतात, तर कधी कधी कुणाची तरी फिरकी घ्यावी म्हणून टाकलेल्या असतात. एक एप्रिल रोजी एप्रिल फुल करण्याच्या उद्देशाने कोणीतरी आपल्या मित्राला जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका लागल्या. अशी बातमी टाकली. त्या बातमीची शहानिशा न करता किंवा त्याची सत्यता न पडताळता ती पोस्ट तशीच दुसऱ्या ग्रुप वर फॉरवर्ड करण्यात आली, आणि मग अशा पद्धतीने ती सतत वेगवेगळ्या ग्रुप वर जात राहिली. यामुळे एकच गोंधळ उडाला. ही गंमत असली तरी अशा बातम्यांचा बऱ्याच लोकांना त्रास होऊ शकतो. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सध्या ज्या ज्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत, त्या त्या ठिकाणी, इच्छुक कार्यकर्ते आपापल्या परीने नियोजन लावत असतानाच, समाज माध्यमावर “जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्याही निवडणूक जाहीर झाल्या” अशी बातमी कोणीतरी टाकली. आणि मग कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका पेक्षा ती निवडणूक महत्त्वाची समजणाऱ्या आणि जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी इच्छुक असलेल्या कार्यकर्त्यांची एकच धावपळ सुरू झाली. अनेकांचे दूरध्वनी खणाणू लागले. यादरम्यान आमच्या प्रतिनिधीने निवडणूक विभागाचे नायब तहसीलदार संतोषजी गुट्टे यांच्याशी संपर्क साधून जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकांच्या अनुषंगाने माहिती घेतली असता, समाज माध्यमावर जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकांची खोटी बातमी व्हायरल होत असल्याची माहिती त्यांनी दिली. जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकांच्या संदर्भात अद्याप कोणतीही अधिकृत अधिसूचना निघालेली नसल्याचा खुलासा त्यांनी केला आहे.

About The Author

error: Content is protected !!