छत्रपती शिवाजी महाराज लोककल्याणकारी राजे होते – डॉ. मारोती कसाब
अहमदपूर ( गोविंद काळे) : जगात आजवर अनेक राजे झाले; मात्र छत्रपती शिवाजी महाराजांसारखा एकही राजा झाला नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या राज्यकारभारात संपूर्णपणे जनतेचे हित पाहिले. आपल्या राज्यकारभाराच्या केंद्रस्थानी जनतेला मानणारे छत्रपती शिवाजी महाराज खऱ्या अर्थाने लोककल्याणकारी राजे होते, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध विद्रोही कवी डॉ. मारोती कसाब यांनी केली.
येथील महात्मा फुले महाविद्यालयात प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली इतिहास विभागाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज स्मृतिदिन कार्यक्रमाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून डॉ. मारोती कसाब बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. दुर्गादास चौधरी हे होते.
यावेळी पुढे बोलताना डॉ. कसाब म्हणाले की, छत्रपती शिवरायांची अनेक आज्ञापत्रे आजही उपलब्ध असून, या आज्ञापत्रांतून त्यांनी आपल्या सैनिकांना, अधिकाऱ्यांना व प्रशासनाला संपूर्ण रयतेची काळजी घेण्याचे आदेश दिलेले आहेत. ‘शेतकऱ्यांच्या शेतातून जाताना त्यांच्या भाजीचा देठही खुडू नका’, असे स्पष्ट आदेश महाराजांनी आज्ञापत्रांतून दिलेले आहेत. महाराजांनी आपले राजकीय धोरण संपूर्णपणे जनहिताचे ठेवून आपल्या राज्यात जनता कशी सुखी, समाधानी आणि आनंदी राहील याचाच सातत्याने विचार केला. म्हणून जगात एकमेव रयतेचा राजा ही त्यांची ओळख कायम आहे, असेही यावेळी डॉ. कसाब आपल्या भाषणात म्हणाले.
या कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप करताना उपप्राचार्य डॉ. दुर्गादास चौधरी म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांची अर्थनीती ही जगप्रसिद्ध असून, महाराजांनी आपले खजाने हे रयतेच्या भल्यासाठी अनेकदा खुले केले होते. महाराजांचे कृषिविषयक धोरण जर अवलंबले तर कधीही शेतकऱ्यांच्या आत्महत्या होणार नाहीत. म्हणून महाराजांच्या राजकीय, सामाजिक, आर्थिक धोरणांचा प्रचलित राज्यकर्त्यांनी आदर्श घ्यावा असेही यावेळी डॉ. चौधरी म्हणाले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक संयोजक इतिहास विभाग प्रमुख डॉ. बब्रुवान मोरे यांनी केले. तर आभार प्रदर्शन राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. पांडुरंग चिलगर यांनी केले. यावेळी प्रो. डॉ. अभिजीत मोरे, प्रा. आतिश आकडे, डॉ. प्रकाश चौकटे, प्रा. दत्ता चव्हाण, डॉ. सचिन गर्जे,प्रा. प्रकाश गायकवाड, कार्यालयीन प्रमुख प्रशांत डोंगळीकर, चंद्रकांत शिंपी यांच्यासह महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
