अहमदपूर ची पोलीस वसाहत बनली जीवघेणी ; कुटुंबासह जिव धोक्यात
नविन निवासस्थानाची आवश्यकता.
# जिव मुठीत घेऊन राहतात वास्तव्याला.

अहमदपूर. [ गोविंद काळे ] : या तालुक्यातील जवळपास ७५ गावांच्या सुरक्षेचा कारभार पाहणारे पोलीस कर्मचारी यांच्या निवासस्थानाची अत्यंत दयनीय अवस्था झालेली आहे. तेथे सर्व घाणीचे साम्राज्य पसरले असून सध्या राहत असलेली घरे पूर्णतः अजीर्ण , खूपच जुने, मोडकळीस आले असून ते कधी ढासाळतील व पोलीस व त्यांच्या कुटुंबाला कधी धोका होईल हे सांगता येत नाही. यासाठी येथे किमान ६५ ते ७० अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी निवासस्थानाची पाण्याच्या सुविधेसह , सुसज्ज अशी सोय लवकर व्हावी यासाठी पोलीस महामंडळाने पुढाकार घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
येथील पोलीस स्टेशनच्या आवारात बांधण्यात आलेल्या पोलीस निवासस्थानाचे बांधकाम हे १९७० च्या दशकात झाल्याचे समजते. आणि सर्व काम दगडी बांधकाम व चुन्यामध्ये करण्यात आलेले आहे. ही जमीन फारच दलदलीची आहे. यामुळे पावसाळ्याच्या काळात येथील हे बांधकाम कधी जमीनदोस्त होईल व ढासळेल हे मात्र सांगता येणार नाही. सर्व कर्मचारी व त्यांचे कुटुंब आपला जीव मुठीत घेऊन तेथे राहत आहेत. तर काही पोलीस कर्मचारी भीतीपोटी इतर ठिकाणी भाड्याच्या खोल्या घेऊन वास्तव्याला राहत आहेत. पण हे सर्व कर्मचारी पोलीस स्टेशनच्या आवारात राहिले तर सुरक्षेच्या दृष्टीने व काम करण्याच्या दृष्टीने सोयीचे व खूप चांगले होणार आहे .येथे डुकरांचा सुळसुळाट व प्रादुर्भाव जास्त असल्याचे पाहायला मिळते.यामुळे परिसरात खूपच दुर्गंधीचे वातावरण असून पोलिसांची सतत धावपळ, रात्रंदिवस काम यामुळे पोलिसांचे आरोग्य बिघडत चालले आहे. याचाही शासन स्तरावर व वरिष्ठ अधिकारी यांनी दखल घेऊन नवीन निवासस्थानाची व्यवस्था करण्याची गरज आहे.
१९३३ ते ३८ च्या निजाम काळात पाच कॉर्टर व पोलीस स्टेशनची इमारत बांधण्यात आल्याचे समजते. सध्या तीन अधिकाऱ्यांचे निवासस्थाने येथे बऱ्यापैकी असल्याचेही समजले. याबरोबरच येथील उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे कार्यालय २००६ मध्ये बांधकाम केलेले असून तेव्हापासून ते अर्धवट अवस्थेतच पडून आहे. त्यावरील शासनाने केलेला खर्च सर्व भुर्दंडच म्हणावा लागेल. अद्यापही ते कार्यालय पूर्ण होऊ शकले नाही.या मुळे उपविभागीय पोलीस कार्यालय दगडी बांधकाम केलेल्या जुन्या जागेतच चालू आहे. अपूर्ण असलेली इमारत पूर्ण होऊन कार्यालय नवीन इमारतीमध्ये जाणे फार महत्त्वाचे आहे. ही सर्व बांधकाम पूर्ण करण्याची जबाबदारी पूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे होती पण सध्या ही जबाबदारी आता पोलीस महामंडळाकडे असल्याचे सांगण्यात आले.
अहमदपूर पोलीस स्टेशनच्या अंतर्गत असलेल्या ७५ गावांचा सुरक्षेचा भार येथील पोलीस कर्मचारी सांभाळत आहेत. येथे उपविभागीय पोलीस अधिकारी एक ,पोलीस निरीक्षक एक, एपीआय दोन ,सहाय्यक फौजदार दोन ,हेडकॉन्स्टेबल 22 ,पोलीस नाईक व पोलीस कॉन्स्टेबल ४० व महिला जागा एक असून पाच कर्मचारी काम करीत आहेत. येथे अधिकाऱ्यांसाठी किमान सहा व इतर कर्मचाऱ्यांसाठी ६० च्या आसपास नवीन निवासस्थानाची आवश्यकता व गरज आहे. नवीन निवासस्थानाची व्यवस्था करण्यात आली तर कर्मचाऱ्यांना व त्यांच्या कुटुंबांना झोप शांत लागेल, काम करण्याची कार्यक्षमता अधिक वाढेल ,त्यांचे आरोग्य सुरक्षित व चांगले राहील, याबरोबर त्यांच्या कुटुंबांनाही समाधान लाभणार आहे. सर्व पोलीस अधिकारी ,कर्मचारी हे एकाच वसाहतीमध्ये राहतील. कोणालाही बाहेर राहण्याची गरज पडणार नाही. पोलीस स्टेशनच्या आवारात राहू लागल्यानंतर सोयीचे व सुरक्षेचे होणार आहे. या सर्व बाबींचा विचार करून पोलिसांसाठी व्यवस्थित ,चांगली व पाण्याच्या सुविधेसह निवासस्थानाची व्यवस्था येथील त्वरित अहवाल मागून घेऊन होत असलेली गैरसोय टाळणे आवश्यक आहे.यापूर्वी जिल्हा पोलीस अधीक्षक ज्ञानेश्वर चव्हाण यांनी बांधकामासाठी अहवाल मागविला होता. पण माशी कोठे शिंकली माहिती नाही.आता तरी सर्व नागरिकांची काळजी घेणाऱ्या पोलीस कर्मचारी निवासस्थानाचे काम वरिष्ठानी पूर्णत्वाला घेऊन जाणे अतिशय आवश्यक बाब आहे.
