न प संकुलात घाणीचे साम्राज्य, संपूर्ण संकुलाचे कचराकुंडीत व मुतारीत रूपांतर.
उदगीर (एल.पी.उगीले) : काही वर्षांपूर्वी उदगीर नगरपालिकेस शहर स्वच्छतेसाठी महाराष्ट्र शासनाकडून दिला जाणारा संत गाडगे महाराज स्वच्छता अभियानाचा पुरस्कार मिळाला होता. पुरस्कार प्राप्त नगरपालिकडे आज पाहिले असता “काखेत कळसा आणि गावाला वळसा” अशी काही परिस्थिती झालेली दिसते, नगरपालिका ज्या संकुलात आहे. त्या संकुलाची अवस्था पाहिली असता ती अक्षरशः कचराकुंडी, मुतारी बनली आहे. या संपूर्ण संकुलात सर्वत्र अस्वच्छता पसरली असून या परिसरात कचरा जिथल्या तिथे पडून असून हा कचरा कोणीही उचलण्यास तयार नाही, तसेच या संकुलाच्या पाठीमागे परिसरात कुठेही, कोणीही लघवी करताना दिसतात. यांना कोणीही मज्जाव करत नाही. तसेच संकुलातील स्वच्छता ग्रहाची परिस्थिती पाहता हे स्वच्छतागृह अस्वच्छ स्वरूपात दिसतात. तसेच मलमुत्र वाहून नेणारी अनेक पाईप फुटलेले दिसून येतात, त्यातून मलमूत्र संकुलाच्या परिसरात पसरत असून त्यामुळे संकुलात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे. या सर्व परिस्थितीकडे नगरपालिका प्रशासन दुर्लक्ष करत असून स्वच्छतेकडे अक्षम्य दुर्लक्ष केले जात आहे. एका निवेदनाद्वारे मनसेने नगरपालिका प्रशासनास सूचित केले आहे की, या विषयाकडे तात्काळ लक्ष घालून कारवाई करण्यात यावी. अन्यथा मनसे उदगीर शहर आपणा विरोधात तीव्र आंदोलन करेल, याची नोंद घ्यावी. आशा आशयाचे निवेदन जिल्हाध्यक्ष संजय राठोड याच्या सुचनेवरुन शहराध्यक्ष संतोष भोपळे,शहर सचिव लखन पुरी, शहर उपाध्यक्ष अविनाश ठाकुर,संग्राम नागपुर्णे,ईश्वर चिद्रेवार,अनिल पटवारी,महेश मोमले,राहुल चव्हाण,भूषण बनाटे यांनी दिले आहे.
