गांधी विचारांमध्ये महावीरांचे प्रतिबिंबडाॅ. रावसाहेब पाटील यांची मिमांसा
लातूर (एल.पी.उगीले) : महात्मा गांधींच्या जीवनशैली व विचारधारेमध्ये भगवान महावीरांचेच प्रतिबिंब असल्याचे मर्मग्राही विश्लेषण प्रख्यात जैनधर्म अभ्यासक व व्यासंगी संपादक डाॅ. रावसाहेब पाटील यांनी येथे केले.येथील सकल जैन समाजाच्या वतीने आयोजित 2622 व्या भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सवाच्या कार्यक्रमात मुख्य वक्ता म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी महोत्सवाचे स्वागताध्यक्ष सुरेश जैन होते. व्यासपीठावर त्यांच्या व्यतिरिक्त श्री 1008 चिंतामणी पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिराचे अध्यक्ष प्रा. महावीर उदगीरकर, लातूर जैन मंडलाचे अध्यक्ष सीए तेजमलजी बोरा यांची उपस्थिती होती.
व्याख्यानापूर्वी पहाटे प्रतिमा पालखीसह निघालेल्या प्रभात फेरीत लहानथोर समाजबांधव व महिला मोठ्या संख्येने उपस्थिती होती. शहरातील दिगंबर जैन मंदिरापासून सुरु झालेली ही विशाल सवाद्य प्रभातफेरी पटेल चौक, खडक हनुमान, जिवराज भवन, सेंट्रल हनुमान, दयाराम रोड, सुभाष चौक, गंजगोलाई, हनुमान चौक मार्गे चंद्रनगरस्थित वर्धमान उद्यानात विसर्जित झाली. त्यानंतर तेथेच भव्य सभामंडपात पाहुण्यांच्या हस्ते जैन धर्म ध्वजवंदन झाले. जैन इतिहासाचे पुनर्लेखन होण्याची गरज असल्याचे सांगून डाॅ. पाटील आपल्या व्याख्यानात बोलताना पुढे म्हणाले, आज जगातील 22 राष्ट्रांमध्ये जन्मकल्याणक महोत्सवाचे औचित्य साधून ‘अहिंसा दौड’ चे आयोजन करण्यात आले असले, तरी केवळ दौड काढून महावीर चेतनेचा जागर होणार नाही. त्यासाठी समाजाचे प्रबोधन करण्याची आवश्यकता आहे. महावीरांनी सांगितलेल्या अहिंसेच्या तत्वज्ञानात त्यांची महत्ता दिसते. तथापि, जैनियांचे आपल्या इतिहासाकडे अक्षम्य दुर्लक्षच झाले, हे वेदनादायी आहे. मुळात, भगवान महावीरांची विचारधारा म्हणजे विश्व विद्यापीठच होय.मानव जातीला कल्याणकारी असलेला जगातील एकमेव धर्म जैन हाच असल्याचे प्रतिपादन विश्वविख्यात विचारवंत व लेखक जाॅर्ज बर्नार्ड शाॅ यांनी केले होते, यातील मर्म समजून घेतले पाहिजे. संविधानात महावीर विचार प्रतिबिंबीत झाले असून भारतीय संस्कृतीतच जैन धर्माचा ओलावा आहे. केवळ पंडितांच्या घरांमध्येच दडलेला जैन धर्म महावीरांनी लोकभाषेत आणला. प्रज्ञेच्या कसोटीवर धर्म तपासण्याची वैचारिक मोकळीक भगवान महावीरांनी दिली, हे त्यांचे महान योगदान होय, असेही डाॅ. पाटील शेवटी म्हणाले.
महोत्सवाचे औचित्य साधून विविध क्षेत्रात स्वतःचे कर्तृत्व सिद्ध केलेल्या जैन समाजातील गुणवंतांचा सन्मान पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला. सत्कारमूर्तींमध्ये डाॅ. मेघना दीपक गुगळे, डाॅ. ऋतुजा उमेश दुरुगकर, पाचशे कोटींची उलाढाल असलेला इथेनाॅल प्रकल्प उभारणारे तरुण उद्योजक प्रथमेश सुनील कोचेटा, योगगुरु दीपक ताराचंदजी गटागट, सौ. सरोज राजकमल अग्रवाल, किरण ब्रम्हेचा, कवयित्री श्रीमती संगीता कासार यांचा समावेश होता.सत्कारमूर्ती व प्रमुख अतिथींचा परिचय देत ज्येष्ठ पत्रकार जयप्रकाश दगडे यांनी कार्यक्रमाचे सूत्रबद्ध संचलन केले. अध्यक्षीय समारोपात सुरेशजी जैन यांनी आयोजनामागील भूमिका स्पष्ट केली. शेवटी दिगंबर जैन समाजाचे अध्यक्ष प्रा. महावीर उदगीरकर यांनी आभार मानले.
महोत्सवानिमित्त आयोजिलेल्या योग शिबीर, रक्तदान शिबीर व अस्थिरोग चिकित्सा शिबीरास समाजबांधवांचा मोठा प्रतिसाद मिळाला.
