राष्ट्रवादीच्या पाठबळावर भाजप बनते खंबीर! काँग्रेसच्या पाठीत कोण कोण खूपसणार खंजीर?
उदगीर(अड. एल.पी.उगीले) कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकांतील चुरस शिगेला पोहोचले आहे. उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी 204 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते, मात्र त्यापैकी छाननी मध्ये २० अर्ज नामंजूर ; १८० अर्ज मंजूर, तर चार अर्ज प्रतीक्षाधीन ठेवण्यात आले होते, दुसऱ्या दिवशी ते चारही अर्ज नामंजूर करण्यात आले आहेत. ते चारीही अर्ज शिवाजीराव हुडे यांच्यासह त्यांच्या समर्थकांचे असल्याचे चर्चिले जात आहे. असे असले तरीही भारतीय जनता पक्षाकडून ज्येष्ठ नेते लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक सहकार महर्षी भगवानदादा पाटील तळेगावकर, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष तथा भाजपचे ज्येष्ठ नेते रामभाऊ तिरुके, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य शिवाजीराव केंद्रे यांच्यासह अनेक दिग्गजांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेले असल्यामुळे आणि त्यांच्या पाठीशी खंबीरपणे राष्ट्रवादीतील एक गब्बर गट सर्व शक्तीनिशी कार्यरत असल्याचे बोलले जात असल्याने भारतीय जनता पक्षाला पाठबळ मिळाले आहे.
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या या निवडणुका म्हणजे आगामी होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व निवडणुकांची रंगीत तालीम ठरणार आहे. आपल्या व्यक्तिगत हेव्या दाव्यातून राष्ट्रवादीच्या काही कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडीचा आदेश बासनात गुंडाळून ठेवून भाजपला सहकार्य करण्याचे निश्चित केल्यामुळे महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याची खुलेआम चर्चा रंगत आहे. खरे तर माजी पालकमंत्र आमदार अमित देशमुख यांनी वेळोवेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे कार्य सिद्धेश्वर उर्फ मुन्ना पाटील यांच्या काळात उत्कृष्ट झाल्याचे सांगितले होते. तसेच भविष्यातही आघाडीचा धर्मपाळत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या तिन्ही समविचारी पक्षाने एकत्र येऊन निवडणुका लढवाव्यात आणि सिद्धेश्वर उर्फ मुन्ना पाटील यांच्या मार्गदर्शनाखालीच बाजार समितीचा कारभार चालावा अशी अपेक्षाही बोलून दाखवली होती. असे असले तरीही, सद्यस्थितीत राष्ट्रवादीचा एक मोठा गट स्वतः जास्त शक्तिशाली बनलो आहोत असे दाखवण्यासाठी काँग्रेसच्या या सूचनांना कोलदांडा घालून, मनमानी करत आहेत. मात्र त्यांची ही मनमानी आज जरी महाविकास आघाडीला भारी पडणारे असली तरी भविष्यात येणाऱ्या सर्व निवडणुकात त्यांना किंमत मोजावी लागणार आहे. तसेच ज्यांच्या जीवावर त्यांच्या उड्या आहेत, त्या नेत्यांना देखील जनतेच्या दरबारात या गोष्टीचा खुलासा करावा लागणार आहे. सद्यस्थितीत उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १८ जागांच्या निवडणुकीसाठी एकूण २०४ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. बुधवारी ( दि. ५ ) येथील सहाय्यक निबंधक कार्यालयात बाजार समिती निवडणुकीसाठी दाखल नामनिर्देशन पत्राची छाननी करण्यात आली. छाननीमध्ये २० जणांचे उमेदवारी अर्ज नामंजूर झाले आहेत. तर १८० जणांचे अर्ज मंजूर झाले आहेत. तर चार अर्जावर आक्षेप आल्याने निकाल प्रतीक्षाधीन असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी बी. एस. नांदापूरकर यांनी दिली. त्याच्याही अर्जावर चर्चा होऊन तेही अर्ज निकाली काढत ना मंजूर करण्यात आले आहेत, त्यामुळे काँग्रेस गटामध्ये आनंदाचे वातावरण दिसून येत होते.

उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी सहकारी संस्था मतदार संघातून १२४ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामध्ये सर्वसाधारण प्रवर्गातून एकूण ८७ अर्ज दाखल करण्यात आले आहेत. बुधवारी झालेल्या छाननीमध्ये ६ अर्ज नामंजूर झाले आहेत. तर ७८ अर्ज मंजूर झाले आहेत. ३ अर्ज निकालाच्या प्रतीक्षाधीन होते तेही आता ना मंजूर करण्यात आले आहेत. महिला प्रवर्गातून एकूण १४ अर्ज दाखल झाले असून त्यापैकी १३ अर्ज मंजूर झाले आहेत तर १ अर्ज नामंजूर झाला आहे. इतर मागासवर्गीय प्रवर्गातून एकूण १२ अर्ज दाखल असून सर्व १२ अर्ज मंजूर झाले आहेत. वि. जा. भ. ज. प्रवर्गातून एकूण ११ अर्ज दाखल झाले असून त्यापैकी २ अर्ज नामंजूर झाले आहेत. तर ९ अर्ज मंजूर झाले आहेत.
ग्रामपंचायत मतदार संघातील सर्वसाधारण प्रवर्गातून एकूण ४० उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. यापैकी ५ अर्ज नामंजूर झाले असून ३४ अर्ज मंजूर झाले आहेत. तर १ अर्ज निकालाच्या प्रतीक्षाधीन होता तोही नामंजूर करण्यात आला आहे. अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातून एकूण १४ अर्ज दाखल झाले असून ४ अर्ज नामंजूर झाले आहेत. तर १० अर्ज मंजूर झाले आहेत. आर्थिक दुर्बल घटक प्रवर्गातून एकूण ८ अर्ज दाखल झाले असून सर्व ८ अर्ज मंजूर झाले आहेत. व्यापारी मतदारसंघासाठी एकूण ९ उमेदवारी अर्ज दाखल झाले असून सर्व ९ अर्ज मंजूर झाले आहेत. हमाल व तोलारी मतदारसंघातून एकूण ९ उमेदवारी अर्ज दाखल झाले असून २ अर्ज नामंजूर झाले आहेत. तर ७ अर्ज मंजूर झाले आहेत. एकंदरीत उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी चार मतदार संघातून एकूण २०४ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. त्यापैकी २४ अर्ज नामंजूर झाले आहेत. तर १८० अर्ज मंजूर झाले आहेत. ४ अर्जावर आक्षेप असल्याने निकाल प्रतीक्षाधीन होते. ते गुरुवारी ( दि. ६ ) छाननी नंतरची यादी प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले, त्यात ते चारही अर्ज नामंजूर करण्यात आले आहेत.
चौकट….१
तळेगावकरांच्या उमेदवारीने चूरस वाढली….
भारतीय जनता पक्षाचे नेते तथा उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती भगवान दादा रामचंद्र पाटील तळेगावकर यांच्या उमेदवारीने भारतीय जनता पक्षामध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकांची भाजपची भिस्त माजी सभापती शिवाजीराव हुडे यांच्यावर अवलंबून होती, मात्र सद्यस्थितीत तरी त्यांचा आणि त्यांच्या काही समर्थकांचा अर्ज ना मंजूर झाल्याने ती बाजू थोडी कमजोर ठरली आहे.असे असले तरी भगवानराव पाटील तळेगावकर, रामचंद्र तिरुके, शिवाजीराव केंद्रे आणि त्यांच्या सहकाऱ्यामुळे भाजपमध्ये लढा देण्याची तयारी निर्माण झाली आहे.
चौकट…..२
नेत्यांच्या सूचनांना कोलदांडा!!
कालचे सामान्य कार्यकर्ते आज गुत्तेदारी करून चार पैसे ठेवून आहेत, त्यांना नेत्यापेक्षा आपणच भारी असे वाटू लागल्याने त्यांनी आपले चेले चपाटे या निवडणुकांमध्ये स्वकीयांच्याच विरोधात अर्थात महाविकास आघाडीच्या विरोधात दंड थोपटून निवडणुकीच्या तालमीत उतरवले आहेत. त्यामुळे आता नेतेमंडळी चांगलीच गोंधळलेल्या अवस्थेत दिसून येत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही नेते म्हणून घेणाऱ्या कार्यकर्ता टाईप राजकारण्यांना जे होते ते चांगलेच होतेय, असे वाटू लागले आहे. कारण त्यांनी यापूर्वीही काँग्रेसचे खच्चीकरण करण्यासाठी आपल्या पक्षाचे अस्तित्व संपले तरी चालेल, मात्र काँग्रेसचा पराभव झाला पाहिजे. अशी भूमिका घेऊन नगरपालिकेचे राजकारण करून दाखवलेले आहे! हा प्रकार म्हणजे नवरा मेला तरी चालेल सवत रांडव झाली पाहिजे अशी भूमिका घेण्यासारखे आहे.
चौकट……३
काँग्रेसच्या पाठीत सुरा खूपसणारे कोण?
सहकारात कुठे राजकीय पक्ष असतो? असा भोंगळा आदर्शवाद सांगत पक्ष विरहित राजकारण करतोय असं दाखवण्यासाठी भाजपच्या गोटात जाऊन खेळी खेळणारे पुन्हा कोणत्या तोंडाने आपल्या पक्षात सक्रिय होतील? हा प्रश्न असला तरीही, यदा कदाचित त्यांच्या नेत्यांनी असे करण्यासाठी त्यांना हिरवा कंदील दाखवला की काय? अशी ही दबक्या आवाजात चर्चा चालू आहे. महाविकास आघाडी होईल यापेक्षा कार्यरत असलेल्या कार्यकर्त्यांमध्ये मात्र उद्विग्नता निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. एकंदरीत अजूनही बंडखोरीच्या पावित्र्यात असलेल्या कार्यकर्त्यांना समज देण्यासाठी नेत्याकडे वेळ आहे, वेळीच योग्य पद्धतीने पॅनल टाकले गेले तर बरे, अन्यथा त्याचे परिणाम दूरगामी भोगावे लागणार हे निश्चित!
