उपेक्षित घटकांना सत्तेत भागीदारी साठी समनक पार्टीचे लोकार्पण प्रा. चव्हाण
नांदेड (एल. पी. उगीले) : समाजातील उपेक्षित आणि दिनदुबळ्या घटकातील जनतेला केवळ मोठमोठ्या घोषणा आणि आश्वासनांची खैरात वाटून त्यांच्या मतावर राजकारण करणारे, आणि विमुक्त जाती, भटक्या जमाती व अठरापगड जातीतील दीनदुबळ्यांना सतत सत्ते बाहेर ठेवून त्यांचा वापर करून घेणाऱ्या राज्यकर्त्यांना धडा देण्यासाठी आणि लोकसंख्येच्या प्रमाणात राजकीय सत्तेत भागीदारी मिळावी. या उद्देशाने समनक जनता पार्टी लोककल्याणाचा विषय घेऊन लोकांसाठी कार्य करणार आहे. असे उद्गार समनक जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. संपत चव्हाण यांनी काढले.
नांदेड जिल्ह्यातील माहूर येथे समन्वयक जनता पार्टी या नवीन राजकीय पक्षाच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र विकास आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष विधीज्ञ अण्णाराव पाटील हे होते. तर उद्घाटक म्हणून तपस्वी योगानंद महाराज, शशिकलाबाई काशिनाथ राठोड नायकळ गोरसिकवाडी भारत, गोर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. संदेश चव्हाण, दशरथ बाबा राऊत, रामकृष्ण कालापाढ, अड. शिवराज खंखरे, फकीरा दलाचे प्रदेशाध्यक्ष सतीश कसबे, मंगेश अवताडे, नंदेश अंबाळकर, सुनील गोटखिंडे, देवराज चव्हाण मध्यप्रदेश, आत्माराम जाधव प्रदेशाध्यक्ष बंजारा टायगर संघटना यांची प्रमुख उपस्थिती होती.
समनक जनता पार्टीच्या लोकार्पण सोहळ्याच्या कार्यक्रमासाठी माहूर शहरातील टी पॉईंट स्थित तीन एकर शेतामध्ये भव्य मंडप उभारून येणाऱ्या कार्यकर्त्यांची उत्तम व्यवस्था केली होती. या कार्यक्रमात बोलताना संस्थापक अध्यक्ष प्रा. संपत चव्हाण म्हणाले की, स्वातंत्र्यानंतरच्या काळात महाराष्ट्रात स्वर्गीय वसंतराव नाईक व सुधाकरराव नाईक यांनी मुख्यमंत्री म्हणून बंजारा समाजाचे प्रतिनिधित्व केले. त्यांनी समाजाचे प्रतिनिधित्व करत असताना उपेक्षित घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला, मात्र ते दोन्ही नेते प्रस्थापित राजकीय पक्षाचे नेतृत्व करत असल्याने त्यांच्या कार्यात अनेक अडथळे निर्माण करण्यात आले. त्यामुळे स्वतंत्रपणे उपेक्षित असलेल्या विमुक्त जाती जमाती, भटक्या समाजातील दीनदुबळ्या जनतेला न्याय मिळवून देणारा पक्ष म्हणून समनक पक्ष कार्य करेल, राज्यातील छोट्या छोट्या जात समूहांच्या संघटनांना सोबत घेऊन तसेच समविचारी घटक पक्षांना एकत्र करून राज्यात मोठी ताकद उभा करण्याचे कार्य समनक जनता पार्टी केल्याशिवाय राहणार नाही. असेही सांगितले.
भव्य दिव्य स्वरूपातील या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रफुल्ल जाधव, अतुल राठोड, उखंड पवार, अरविंद राठोड तसेच मराठवाड्यातून आलेल्या विविध वाड्या, तांड्यावरील कार्यकर्त्यांनी परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी केला. महाराष्ट्रातील राजकारणाला नवी दिशा देणाऱ्या या राजकीय पक्षामुळे अनेक राजकारणी लोकांच्या भुवया उंचावल्या आहेत. असे म्हटले तर वावगे होणार नाही.
