हेमाडपंती वास्तूकलेचा उत्तम नमुना अकराशे वर्षापूर्वीचे खडकेश्वर महादेव मंदिर

हेमाडपंती वास्तूकलेचा उत्तम नमुना अकराशे वर्षापूर्वीचे खडकेश्वर महादेव मंदिर

अहमदपूर( गोविंद काळे ) खडकेश्वर महादेव मंदिर हे धार्मिक जिल्हा म्हणून ओळखला जाणाऱ्या नंदिग्राम (नांदेड ) जिल्ह्यात आहे.मुखेड तालुक्याचे प्राचीन नाव मोहनावती असून दक्षिणेस 32 किमी अंतरावर खडका हे गाव वसलेले आहे.या गावास मुक्रमाबाद या ही नावाने ओळखले जाते.
बाराव्या शतकात नंदिग्राम जिल्हात होट्टल हे कल्याणी चालुक्यांचे राजधानी होते.या काळात मंदिरातील कलात्मक दृष्ट्या अप्रतिम वास्तुकला प्रसिद्ध होती.
मंदिरे घडवित असताना त्यास कल्पक कलेची जोड दिली तर एक उत्कृष्ट वास्तू निर्माण होते.धार्मिक वास्तू उभारण्यामागे वास्तूकला,शिल्पकला,खगोलशास्त्र,अंकशास्त्र या सर्वाचा आभ्यास करुन हिंदू धर्माचे पवित्र स्थान असणाऱ्या मंदिराची निर्मिती करण्यात येत असे.तत्कालीन जीवनातील गतवैभव कल्याणी चालुक्य काळातील मंदिर शिल्पातून पहावयास मिळते.

भौगोलिक परिस्थिती –

कर्नाटक राज्याच्या सीमेवर 3 कि.मी.अंतरावर मराठवाड्यातील कोपऱ्यात वसलेले खडका (मुक्रमाबाद ) हे गाव सांस्कृतिक दृष्टीने नदीच्या संगमावर वसलेले आहे.उदगीर येथिल किल्ल्याजवळून वाहणारी लेंडी नदी व तिरु नदीचा संगम खडका येथे होतो.ही नदी पुढे मांजरा नदीस मिळते.प्राचीन भारतीय संस्कृतीतील लोकजीवन हे बहुदा नदींच्या शेजारीच पहावयास मिळते.विविध संकृतीचा उगम यात प्रामुख्याने नदीचा उल्लेख होतोच.लेंडी नदीचा प्रवाह खडकाळ भागातून होऊन व पुढे जाऊन मुक्रमाबाद या गावात संगम होतो. स्वातंत्र्याच्या पुर्वीपासून या गावास खडका या नावाने ओळखत असत. या परिसरात बेसाल्टचा काळा पाषाण मोठ्याप्रमाणात पहावयात मिळतो.खडका हे गाव परीसरातील बाजारपेठेसाठी प्रसिद्ध आहे.याठिकाणी काळ्या पाषाणात घडवलेली कल्याणी चालुक्यकाळातील खडकेश्वर महादेव मंदिर पहावयास मिळणे हे खडका वासीयांचे भाग्यच समजावे लागेल.
भारतात प्राचीन काळात दैवतांची भव्य देवळे बांधण्याची प्रथा होती. गुप्त काळापासून आजतागायत भारतातील विविध प्रांतात विविध शैलीचे मंदिरे बांधली गेली. स्थानिक स्थापत्यशास्त्र, शिल्पकला, कलाकुसर वगैरेंचा या मंदिराच्या बांधकामावर मोठा प्रभाव दिसतो. प्राचीन संस्कृतीची ओळख आणि माहिती करून देण्यात मंदिरे, वास्तूकला, शिल्पकला ही महत्त्वाची भूमिका बजावतात.
महाराष्ट्रात अतिशय सुंदर दगडी बांधकामाची आणि अप्रतिम कोरीव नक्षीकामाने सजवलेली मंदिरे ही हेमाडपंती शैलीच्या नावाने ओळखली जातात.
घडीव दगडांवर दगड रचून तयार केलेली वास्तू हे हेमाडपंती मंदिरांचे खास वैशिष्ट्य मानले जाते. बांधकाम करण्यासाठी चुना, माती न वापरता अशा शैलीच्या मंदिरांचे बांधकाम केले आहे. दगडांवरील सुबक शिल्पकला छतावरील नक्षी,प्रवेशद्वारावरील द्वारपाल,यक्ष यक्षीणी,नक्षीदार वेली या मंदिरांना एक नवचैतन्य रूप प्रदान करतात.
हेमाडपंती मंदिरे पक्क्या बांधकामाची नसून दगडावर दगड रचून कमी वेळात मंदिर निर्माण करण्याची शैली हेमाडपंती मंदिरात पहावयास मिळते.

अनेक ठिकाणी भूकंप,पूर, पावसामुळे होणारी झीज, दगडांच्या भेगांतून उगवणारे झुडपे यातून अनेक मंदिरांची दुर्दशा झाली आहे.
यादव राजे कलाप्रेमी असल्याने हेमाडपंती मंदिरे या काळात निर्माण झाली.प्रत्येक मंदिराचे आपले स्वत:चे वेगळे वैशिष्ट्य आहे. मंदिराचे स्थापत्यकार,वास्तूविशारद हेमाडपंत यांच्या कौशल्याचे दर्शन त्यांनी साकारलेल्या मंदिरातून पहावयास मिळते.

हेमाडपंती मांदिराची वैशिष्ट्ये

देवगिरीचा राजा रामदेवराव यादव यांच्या काळात (सन 1271 ते 1311) मुख्य प्रधान राहिलेल्या हेमाद्री पंडित किंवा हेमाडपंत यांनी या प्रकारच्या मंदिर बांधणीचा ठीक ठिकाणी उपयोग केल्याने ही बांधणीपद्धत त्यांच्या नावावरून हेमाडपंती म्हणून ओळखली जाऊ लागली. भारतीय स्थापत्यशैलींपैकी एक प्रमुख शैली म्हणून हेमाडपंती शैलीचा उल्लेख केला जातो. मंदिरांचे हेमाडपंती पद्धतीने केलेले बांधकाम टिकून राहिलेली आजतागायत पहावयास मिळतात.
इमारत बांधायची तर दगड किंवा विटा एकमेकांस घट्ट चिकटून राहाव्यात म्हणून माती, चुना, सिमेंट इत्यादींपैकी काही वापरावे लागतेच… पण हेमाडपंती मंदिरे ह्याला अपवाद आहेत.हे मंदिर चिरे त्रिकोण,चौकोन, पंचकोन, वर्तुळ, अर्धवर्तुळ इत्यादी आकारांत घडवून ते एकमेकांत कुशलतेने बसवण्याची ही एक कला होती.या कलेतून या शैलीचा उगम झाला.व पुढे हेमाडपंती शैली नावाने ओळखले जाऊ लागले.
गाभारा चौकोनी व सभांडपाला अनेक अलंकृत खांब असून प्रत्येक खांबांवर व छत्तावर विविध प्रसंगांची चित्रे,नक्षीकाम कोरलेली आहेत. छतावरील मोकळ्या भागावर नक्षी काढून सभामंडपाला आधार दिलेला आहे.हेमाडपंती देवालये प्रामुख्याने पूर्वाभिमुख पहावयास मिळतात.मंदिर हे अशा प्रकारच्या वास्तुकलेचा दुर्मिळ नमुना आहे.

खडकेश्वर महादेव मंदिर

बाराव्या शतकातील खडका येथिल हेमाडपंती मंदिराची रचना गर्भगृह,मुखमंडप,अंतराळ,दोन्ही बाजूस एक अशी दोन स्वतंत्र गर्भगृह,व द्वार मंडम या पद्धतीने आहे.मुळ मंदिराची पुर्व-पश्चिम लांबी 48 फुट तर दक्षिण -उत्तर रुंदी 34 फुट इतकी असून मंदिर जवळपास 30 स्तंभावर उभारलेले आहे.मंदिरांचा आकार साधारणपणे चौकोणाकृती आहे.

मंदिरातील स्तंभावरील नक्षीकाम तीन भागात विभागलेले आहे.तळभाग हा चौकोनी असून मध्य भागावर सुरेख अशी नक्षी साकारलेली पहावयास मिळते.अनेक भौमितिक आकाराचे सुंदर मिलाप,साखळीचे अलंकरण,आष्टकोन,षटकोनाकृती,चौरसाकृतीचा वापर केले आहे. छताकडीव वरील भागावर गोलाकार कड्यांनी कमी कमी होत जाणाऱ्या आत बाहेर येणाऱ्या कड्यांनी सजावट केली आहे.यामुळे स्तंभाची उंची व भव्यता मनाला मोहून घेतल्याशिवाय रहात नाही.मंदिराचे बाह्य बाजूनी नंतरच्या काळात भिंती बांधल्यामुळे बाह्य बाजूवर शिल्प आहेत किंवा नाही हे आज सांगता येत नाही. हे मंदिर त्रिदल पद्धतीचे असल्याने येथे तीन गृभगृहे ब्रम्हा,विष्णू व महेश याचे रुप या मंदिरात आहेत.मंदिराचे शिखर हे करडखेड येथिल मंदिराप्रमाणे सपाट पहावयास मिळतो.मुख्य गर्भगृहावर नंतरच्या काळातील बांधलेला शिखर पहावयास मिळतो.
सभागृहात छानसा नंदी आहे.त्यावरील नक्षीचे झीज झाली आहे.नंदीमंडपावरील छताचे नक्षीकाम खूपच सुंदर आहे.चार कोपऱ्यात व्याघ्रहाचे मुखवटे व बाजूने अलंकारीक नक्षी साकारलेली आहे.योग्य त्या ठिकाणी उठावदार फुले कोरलेली आहेत.भौमितिक आकारांचा वापरातून छताचे काम पुर्ण केले आहे.मुखमंडप हा मंदिराचा देखणा मंडप असतो या ठिकाणीच गर्भगृहाचे प्रवेश द्वार असतो.
या प्रवेशद्वारावर स्वागतासाठी तळभागावरील दोन्ही कोपऱ्यात गजलक्ष्मी मुर्तिशिल्पे व चवरीधारक स्त्रीशिल्पे आहेत.मध्य भागावर अलंकारीक आकाराने सजावट करुन वरील भागावर मेरु पर्वतासारखे उंच निमुळते होत जाणारे शिखरांची रांगा कोरलेली आहेत.
गर्भगृहाचे आकार 8×8 फुट असून हे चार स्तंभावर उभारलेला आहे.शिवपिंडाचा आकार जवळजवळ साडेतीन फुट एवढा आहे.गर्भगृहेच्या उत्तर दिशेला पायापासून तीन फुटावर एक सज्जा आहे.या ठिकाणी दिवा अगरबत्ती ठेवले जात असावेत. छताच्या आतील भागावर गोलाकार पाना फुलांच्या आकाराने नक्षीकाम आढळते.मंदिरातील सर्व स्तंभाला कलेचे अज्ञान असल्याने विस्वस्ताकडून नंतरच्या काळात रंगरंगोटी केल्यामुळे मंदिराचे मुळ अस्तित्व नष्ट झालेले आढळते.

खडकेश्वर मंदिरात इतर दोन उपगर्भगृह आहेत याची लांबी रुंद 5.5 फुट ते 4.5 फुट इतकी आहे.विशेष म्हणजे उत्तरेकडील शिवपिंड हे पुर्वेकडे तोंड करुन आहे.असे मंदिर खूपच क्वचित प्रमाणात आढळतात.या उपगृहाचे प्रवेशद्वारावर सुरेख नक्षी पहावयास मिळते.
मंदिर परिसरात अनेक भग्नावशेष पहावयास मिळतात.मुळ मंदीराच्या समोर मोठे प्रांगण आहे या प्रांगणात दिपमाळ,मारोती मंदिर व शनिदेवतांचे मंदिर हे नंतरच्या काळात बांधलेले आहे.
प्रतिवर्ष खडकेश्वर महादेव मंदिरात सात दिवस अखंड शिवनाम सप्ताहचे आयोजन केले जाते.खडका येथिल आठवडी बाजार शुक्रवारी आसल्यामुळे शनिवारी पहाटे हजारो भाविकांच्या उपस्थितीत रथोत्सव व भस्म उथळण केले जाते.समाप्तीला हजारोच्या संखेने असलेले भाविक भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन केले जाते.

         महादेव शरणप्पा खळुरे 
         कला अभ्यासक
         मो.8796665555

About The Author

You may have missed

बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या महिलेकडून आणखी तीन तोळे सोने जप्त, पाच गुन्हे उघड.‎‎ लातूर (एल पी उगिले) जिल्ह्यातील विविध बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी प्रभावी कारवाई करत एका महिला आरोपीस अटक करून तिच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या कारवाईमुळे औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर येथील बसस्थानक परिसरात घडलेल्या चोरीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.‎लातूर जिल्ह्यातील मालमत्तेविषयक गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी कडक निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथक सातत्याने गस्त व माहिती संकलन करून गुन्हे उघडकीस आणण्याचे काम करत आहे.‎ सदर पथकाने दिनांक 5 मार्च रोजी पुनम जितू कांबळे (वय ३४ वर्षे, रा. गांधीनगर, उदगीर, जि. लातूर) हिला ताब्यात घेऊन तिच्याकडून एक सोन्याचे मणी मंगळसूत्र व एक सोन्याची साखळी असा अंदाजे १३ ग्रॅम ३९० मिली वजनाचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला होता. पुढील तपासासाठी तिला पोलीस ठाणे औसा यांच्या ताब्यात देण्यात आले होते.‎ तपासादरम्यान आरोपी पुनम कांबळे हिने तिची साथीदार अनिता विशाल कांबळे (रा. गांधीनगर, उदगीर) हिच्यासह मागील चार ते पाच महिन्यांपासून औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर बसस्थानक परिसरात बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. ‎त्यावरून नमूद महिला आरोपी पुनम जितू कांबळे यास पुढील तपास कामी पोलीस ठाणे अहमदपूर यांचे ताब्यात देण्यात आले. दरम्यान पोलीस ठाणे अहमदपूर व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने तपास करून पोलीस ठाणे अहमदपूर येथे दाखल असलेल्या सोनसाखळी चोरीच्या आणखी तीन गुन्ह्यांतील जवळपास तीन तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.‎याप्रमाणे सदर कारवाईत आरोपी कडून एकूण जवळपास 4.3 तोळे सोन्याचे दागिने, सध्याच्या बाजारभावा नुसार अंदाजे 6 लाख 50 हजार रुपये किमतीचा सोन्याच्या दागिन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण पाच गुन्हे उघडकीस आणण्यात लातूर पोलिसांना यश आले आहे.ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे अहमदपूर यांच्या संयुक्त पथकाने पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर व पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, विजय पाटील, तुळशीराम बरुरे, पाराजी पुटेवाड, हरी पतंगे, चंद्रकांत केंद्रे, महिला पोलीस अंमलदार सुरेखा मदने, अंजली गायकवाड तसेच पोलीस ठाणे अहमदपूर येथील पोलीस अंमलदार बी. पी. साळवे व जायभाये यांनी केली आहे.‎बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन होणाऱ्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्या साठी लातूर पोलीस दल सातत्याने दक्ष आहे. नागरिकांनी प्रवास करताना आपल्या मौल्यवान वस्तूंबाबत विशेष काळजी घ्यावी तसेच संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास माहिती द्यावी, असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!